Wed, Apr 24, 2019 11:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शॅगीच्या बहिणीकडून पैसा भारताबाहेर

शॅगीच्या बहिणीकडून पैसा भारताबाहेर

Published On: Jun 24 2018 1:45AM | Last Updated: Jun 24 2018 1:37AMठाणे : नरेंद्र राठोड

भारतात बसून बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणार्‍या मीरा रोड कॉलसेंटर प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शॅगी ठक्कर याची बहीण रिमा ठक्कर- जोशी हिला ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली. दरम्यान, बोगस कॉल सेंटर मधून कमावलेला पैसा रिमा दिल्लीतील एका करन्सी एक्स्चेंज कंपनी मार्फत विदेशात पाठवत असे, अशी माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. रिमाने किती पैसे देशाबाहेर पाठवले याचा पोलीस शोध घेत आहेत. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी शॅगीची जामिनावर सुटका होताच ठाणे पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेली शॅगीची मोठी बहीण रिमा ठक्कर जोशी हिला गुरुवारी अटक केली. रिमा विवाहित असून ती आपल्या पतीसह अहमदाबाद मध्ये राहते. मीरा रोड येथे कॉल सेंटर स्थापन करण्यापूर्वी शॅगी देखील आपल्या बहिणीकडेच राहायचा. शॅगीच्या या फसवणुकीच्या धंद्यात रिमा त्यास मदत करायची. रिमाने आतापर्यंत कोट्यावधी रुपये दिल्लीतील एका करन्सी एक्सचेंजच्या माध्यमातून विदेशात पाठवल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. 

630 कर्मचार्‍यांचे जबाब तर 197 जणांना अटक

या प्रकरणात आतापर्यंत ठाणे पोलिसांनी बोगस कॉल सेंटर मध्ये काम करणार्‍या 630 कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले असून 197 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले जवळपास सारेच जण सध्या जामिनावर असून रिमा ठक्कर ही एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. 

असा सुरु झाला होता फसवणुकीचा बाजार

मीरा रोड तेथील बोगस कॉल सेंटरची कल्पना प्रत्यक्षात रुजली ती एका अमेरिकन कंपनीत काम करणार्‍या सागर उर्फ शॅगी ठक्कर या 23 वर्षीय भारतीय तरुणाच्या डोक्यातून. त्याने मीरा रोड येथील काशिमीरा भागातील डेल्टा गार्डन जवळ हरीओम आयटी पार्क ही सात मजली इमारत भाड्याने घेतली. त्यासाठी प्रतिमहा 7 लाख रुपये भाडे मोजले.  

तिथेच विविध कंपन्यांच्या नावाखाली शॅगीने आपले कॉल सेंटर सुरु केले. नोयडा, गुडगाव आणि दिल्ली येथील कॉल सेंटर मधून बाहेर पडलेल्या काही टीम लीडरचा शॅगीने शोध घेतला आणि त्यांना आपल्या संपर्कात आणून त्याने त्यांना कामाला ठेवले. या सर्वांना लाखोंच्या घरात पगार दिला होता. फर्डे इंग्रजी बोलणार्‍या तरुणांना कॉल सेंटरमध्ये कामाला ठेवायचे असा सपाटा शॅगीने सुरु केला. यात रिमा ठक्कर हिने मदत केली. प्रत्येक तरुणास एक स्क्रिप्ट आणि काही फोन क्रमांक दिले जायचे. त्यानंतर त्यांना काही दिवसांची ट्रेनींग देण्यात येऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जायची. 

तरुणांना देण्यात येणार्‍या स्क्रिप्टमध्ये लिहल्या प्रमाणे संवाद साधावा लागे. संवादात कायदेशीर बाबींचा उल्‍लेख आला की पलीकडचा अमेरिकन नागरिक लगेचच पैसे दंड स्वरूपात भरण्यास तयार होतो, याची कल्पना येथे काम करणार्‍या तरुणांना यायची. काम करणारे तरुण फक्त पैशासाठी ते काम करायचे. असे सावज मिळाले की, मोठी रक्कम भेट म्हणून देण्याचे आमिष शॅगीने दाखवले. त्यामुळे येथे कामाला लागणारा प्रत्येक तरुण रोज अधिकाधिक सावजांना कॉल करून धमकवण्याचा व फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. 

या कॉल सेंटर मधून रोज 700 ते 800 अमेरिकन नागरिकांना कॉल केले जायचे. त्यापैकी 50 ते 100 सावज कॉल करणार्‍यांच्या जाळ्यात अडकायचे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड स्वरूपात 8 हजार ते 10 हजार डॉलरपर्यंत रक्कम गिफ्ट कार्डच्या माध्यमातून स्वीकारली जायची.