Fri, Jul 19, 2019 01:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ....शाब्बास मुंबई पोलीस!

....शाब्बास मुंबई पोलीस!

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:49AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

तसा मुंबईला कायम अलर्ट असतोच. मात्र, 30 डिसेंबरच्या सायंकाळपासून मुंबई पोलीस थर्टिफर्स्टच्या बंदोबस्ताला लागले. थर्टी फस्टचा हँगओव्हर कायम असतानाच भीमा कोरेगाव प्रकरण उद्भवले आणि गेले दोन दिवस हे आंदोलनही संयम आणि शांततेने हाताळत पोलिसांनी एक नवा दाखला निर्माण केला. कारण, गेले पाच दिवस मुंबईचे तब्बल 30 हजार पोलीस सलग ड्युटीवर आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या आधीच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात या आंदोलनामुळे पुन्हा आराम घेण्याचे स्वप्न पाहणेही कठीण झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक आक्रमक झाले तरी संयम राखा, असे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. दोन दिवसांच्या आंदोलनात पोलिसांनी हे आदेशही तंतोतंत पाळले आणि प्रसंगी आंदोलकांचा मार झेलत परिस्थिती हाताळली. 

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ गेले दोन दिवस मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्रीपर्यंत 15 गुन्हे दाखल केले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, नियम, आदेश आणि अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा व भादंवी कायद्यान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सुमारे 250 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.  पवई पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह 13 पोलीस जवान जखमी झाले आहेत. गोवंडी पोलीस ठाण्यातील एका महिला शिपायासह 11 जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

शहरात महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे, स्थानिक तसेच पोलिसांकडून मोबाईलमध्ये करण्यात आलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ तपासण्यात येत आहेत. स्थानिक प्रत्यक्षदर्शींसोबत आंदोलनामध्ये नुकसान झालेल्या गाड्यांचे चालक, तसेच जखमी व्यक्ती आणि पोलिसांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.