Wed, Jul 17, 2019 18:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाब्बास मुंबई पोलीस! लाँग मार्च शांततेत, कुठेही कोंडी नाही!!

शाब्बास मुंबई पोलीस! लाँग मार्च शांततेत, कुठेही कोंडी नाही!!

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

हक्कांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे काढण्यात आलेल्या हजारो शेतकर्‍यांच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी नियोजनबद्धरीतीने आखणी केल्याने हा मोर्चा अखेर शांततेत पार पडला. हजारोंच्या संख्येत मुंबई शहरात धडकलेल्या या मोर्चामूळे वाहतूक कोंडी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आधीच विशेष खबरदारी घेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले.
शेतकर्‍यांचा मोर्चा रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलूंड पुर्वेकडील आनंदनगर टोलनाक्यावरुन शहरात प्रवेश करुन सायनमधील सोमय्या मैदानात रात्रीच्या मुक्कामी आणि दुसर्‍या दिवशी सकाळी आझाद मैदानात जाणार असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक व बंदोबस्ताची आखणी केली होती. रविवारी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पुर्व द्रुतगती मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळवून हा मार्ग मोर्चे कर्‍यांसाठी मोकळा करुन दिला होता. तसेच या मार्गालगत असलेल्या मुलूंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, सायन विभागातील स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

रविवारी रात्री मोर्चा सोमय्या मैदान पोहचण्याच्या आधीच मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांसह राज्य राखीव बलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलिसांनी याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच याठिकाणी राजकीय नेतेमंडळी आल्याने मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्‍वान पथके तैनात ठेवण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघणार होता. यासाठी पोलिसांनी बंदोबस्त आणि वाहतूकीचे नियोजनसुद्धा केले होते.

दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोर्चाचा नाहक त्रास होऊ नये म्हणून मोर्चेकरी शेतकर्‍यांनी रात्रीच आझाद मैदान गाठण्याचा निर्णय घेत रातोरात आझाद मैदान गाठले. त्यांच्या सुरक्षेसाठी मध्यप्रादेशिक आणि दक्षिण प्रादेशिक परिमंडळातील अप्पर आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अंमलदार तैनात होते. तसेच रविवारी रात्रीपासूनच आझाद मैदान आणि मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आझाद मैदानात मोर्चा पोहचल्यापासून ते आझाद मैदानात मोर्चेकर्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी केलेली भाषणे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाने घेतलेली भेट आणि त्यानंतर मागण्या मान्य झालेल्या इतिवृत शेतकर्‍यांना देण्यापर्यंत आझाद मैदानील   कडक बंदोबस्त कायम ठेवला होता. हजारोंच्या संख्येने धडकलेला मोर्चा कोणतेही गालबोट न लागता शांततेत आणि नियोजनबद्द पार पडल्याने पोलीस यंत्रणेसह मुंबईकरांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.