Wed, Jan 23, 2019 12:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन मुलीवर 9 तरुणांकडून लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर 9 तरुणांकडून लैंगिक अत्याचार

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

शारीरिक संबंधाचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन नऊ तरुणांनी एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. 

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शनिवारी नऊ आरोपींविरोधात विलेपार्ले पोलिसांनी विनयभंग, बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सहा तरुणांना अटक केली तर पळून गेलेल्या तिघांचा तपास सुरु आहे. आरोपींना रविवारी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दहावीमध्ये शिकत असलेल्या पीडित मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिला सोमवारी चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे. पीडित मुलगी पालकांसोबत विलेपार्लेतील स्लम परिसरात राहते. आई घरकाम तर वडील बांधकाम मजूर म्हणून कामाला आहेत. आरोपी याच परिसरातील आहेत. गेल्या वर्षी एका तरुणाने तिच्याशी मैत्री करुन लग्नाचे आमिष दाखवले. तिला अश्‍लील व्हिडीओ दाखवून जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याच्या एका मित्राने दोघांचे शारीरिक संबंधाचे व्हिडीओ काढले होते. तेच व्हिडीओ दाखवून या मित्रानेही तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची तिला धमकी दिली होती. या दोघांनी ही माहिती इतर मित्रांना दिली. त्यांनीही तिला रस्त्यावर गाठून धमकावण्यास सुरुवात केली. ते सर्वजण तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. अखेर तिने आईला याबाबतची माहिती दिली. प्राथमिक तपासात तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.