Sat, Nov 17, 2018 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडाळा दुर्घटनेनंतर तज्ज्ञांची समिती स्थापन करा : हायकोर्ट

वडाळा दुर्घटनेनंतर तज्ज्ञांची समिती स्थापन करा : हायकोर्ट

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

25 जून रोजी वडाळा येथे घडलेल्या भूस्खलनप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली होती.बांधकाम व्यावसायिकाने त्याठिकाणी सुरू असलेले काम थांबवावे व झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी आयआयटी अथवा व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

दोस्ती पार्कचे काम करणार्‍या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे लॉईड्स इस्टेटच्या बाजूची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेमुळे दोस्ती एकर्स आणि लॉईड इस्टेट संकुलातील इमारतींना तडे गेल्यामुळे रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.वडाळ्यात दोस्ती पार्कच्या कामामुळे परिसरातील इमारतींना धोका असल्याचे पत्र तब्बल सहा वेळा इमारत आणि प्रस्ताव विभागाच्या अधिकार्‍यांना दुर्घटनेआधी दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.वडाळ्यात संरक्षक भिंत खचल्याच्या  गंभीर प्रकारानंतर लॉईड्सच्या सी आणि डी विंगच्या भिंतींना तडे गेले असून संपूर्ण कॉम्प्लेक्समधील इमारतींना धोका निर्माण झाला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

सध्या या ठिकाणच्या इमारतींची गॅस लाईन बंद करण्यात आली असून नागरिकांना स्वयंपाक करण्यासाठी अडचणी येत आहेत. हलगर्जी अधिका़र्‍यांना निलंबित करून फौजदारी कारवाई करा, अशी मागणी होत आहे.25 जून रोजी वडाळ्यात भिंत खचून 15 वाहने गाडली गेली. नागरिकांचा जीव धोक्यात घालणा़र्‍या अधिकार्‍यांना तुरुंगात पाठवा, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीयांनी पालिका सभागृहात बैठकीवेळी केली. महापौर  विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात पालिका आयुक्त अजोय मेहता यांचेसह रहिवासी यांची एकत्रित बैठक पार पडली. त्यावेळी प्रशासनाने रहिवाशांच्या मागण्या मान्य केल्या.