होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमपीएससीत अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग : मुख्यमंत्री

एमपीएससीत अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग : मुख्यमंत्री

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:31AM

बुकमार्क करा
मुंबई : खास प्रतिनिधी

अनाथ असल्याने एका मुलीला तिची जात लावता न आल्याने राखीव आरक्षणापासून वंचित राहावे लागले, या एका विलक्षण उदाहरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या परीक्षेत अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. 

अमृता नावाच्या एका मुलीला एमपीएससीच्या परीक्षेत मिळालेले गुण खुल्या वर्गासाठी अपुरे असले, तरी तिला अनुसूचित जातीसाठीच्या प्रवर्गातून भरती होण्यासाठी ते पुरेसे होते. मात्र ती मुलगी अनाथ असल्याने तिला कुठली जात लावायचा हा प्रश्‍न होता. जात लावता येत नसल्याने तिला कुठल्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे असा पेच निर्माण झाला. अखेर त्या मुलीच्या उदाहरणावरून अनाथ मुलांसाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिली. याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे. एमपीएससीच्या परीक्षेत पास व्हावे यासाठी हजारो जण अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यापैकी काही जणांना खुल्या तर काही जणांना राखीव प्रवर्गातून यश मिळते. मात्र अनाथ असल्याने निराधार असलेल्यांना यापैकी कशाचाही फायदा घेता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनाथांच्या संघर्षाला आधार मिळू शकेल.