Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेअर बाजारात पडझड; अवघ्या काही मिनिटांत 2.24 लाख कोटी गमावले

शेअर बाजारात पडझड; अवघ्या काही मिनिटांत 2.24 लाख कोटी गमावले

Published On: Feb 09 2018 10:06AM | Last Updated: Feb 09 2018 10:37AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. आज सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 563 अंकांनी आपटला आणि तो 33 हजार 849.65 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीत देखील 1.5 टक्क्यांची घसरण होत तो 10 हजार 500च्या खाली आला.  

गुरुवारी सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत तेजीचे वातावरण राहील अशी शक्यता वाटली होती. मात्र  शुक्रवारी सकाळी 9.45ला बाजार सुरु होताच सेन्सेक्स 457 अंकांनी तर निफ्टी 139 अंकांनी घसरला. गेल्या सात दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार 200 अंकांची घसरण झाली आहे. 

डो जोन्सने गुंतवणूकदारांसाठी दिलेल्या नकारात्मक संदेशानंतर जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम आशियातील सर्व प्रमुख बाजारपेठांवर झाला आहे.  

काही मिनिटांतच कोटी गमावले

जागतिक बाजारपेठेतील मंदीचा मोठा फटका शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना बसला. सेन्सेक्समधील 10 पैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी बाजार सुरु होताच काही मिनिटात गुंतवणुकदारांचे 2.24 लाख कोटी रुपये बुडाले. बाजारात विक्रीची लाट झाल्यामुळे सेन्सेक्समधील पहिले 50 शेअर्समध्ये घसरण होत आहे. मेटल उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला याचा सर्वात मोठा  फटका बसला आहे. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरची जोरदार विक्री केली जात आहे.