Tue, Jun 25, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वादग्रस्त देखाव्यांमुळे कल्याणात खळबळ !

वादग्रस्त देखाव्यांमुळे कल्याणात खळबळ !

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:21AMडोंबिवली/कल्याण : वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या करण्यात येणार्‍या जयंतिनिमित्त रविवारी कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील शिवसेना शाखेतर्फे वादग्रस्त देखावा उभारण्यात आल्याने एकच खळबळ माजली. अहमदनगरचे भाजपचे माजी उपमहापौर छिंदम, भारताविषयी अनुद‍्गार काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, सिमेवर लढणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांविषयी अश्लाघ्य वक्तव्य करणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे खासदार नेपाल सिंह यांचे विडंबनात्मक चित्र कटआऊट्सद्वारे काढण्यात आले खरे. मात्र, यानंतर महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत हे कटआऊट्स काढण्याचे फर्मान आयोजकांना सोडत नोटीस बजावली. 

तिथीप्रमाणे छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी राज्यभर पहावयास मिळाला. कल्याणसह डोंबिवली शहरातही ठिकठिकाणी मिरवणुका काढून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. जयंती उत्सव साजरा होत असतानाच कल्याणमधील रामबाग शिवसेना शाखेतर्फे वादग्रस्त देखावे उभारण्यात आले. या देखाव्यांत छिंदम यांना किन्नर अर्थात तृतीय पंथीयांच्या रुपात दाखविण्यात आले. गळ्यात चपलांचा हार, नाकात नथ, कानात डूल, ओठाला लिप्स्टीक लावण्यात आली आहे.  तर भारताविषयी अनुद‍्गार काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना एका पाकिस्तानी मुजरा नर्तकीच्या रुपात दाखविण्यात आले आहे. याशिवाय सिमेवर लढणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांविषयी अश्लाघ्य वक्तव्य करणारे आ.प्रशांत परिचारक, खा. नेपाल सिंह यांच्यावरही या कटआऊट्सद्वारे निशाणा साधण्यात आला. 

शिवसेनेच्या रामबाग शाखेने हा वादग्रस्त देखावा उभारल्याचे कळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रामबाग शाखेला पोलिसांनी नोटिशीद्वारे वादग्रस्त देखाव्याविषयी हरकत घेतली आहे. हा देखावा तात्काळ काढून टाकण्यात यावा असे या नोटिशीमध्ये बाजावण्यात आलेले आहे. एकीकडे या देखाव्यातील व्यक्ती या भाजपाच्या असून भाजपावर शिवसेेनेने निशाणा साधल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे रामबाग शाखेचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून घटनास्थळी तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.