Mon, Apr 22, 2019 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर शुक्रवारी मध्यरात्री मुर्हूत मिळाला. गृहमंत्रालयाने 12 पोलीस उपायुक्तांना बढत्या दिल्या असून 6 विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अनेकांच्या बदल्या करत खांदेपालट केला आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारांबे यांना पुन्हा मुंबईमध्ये नियुक्ती देत राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली असून भारांबे यांच्या  जागेवर राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पी. पी. मुत्याल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची नागपूर शहर पोलीस दलात, तर त्याच्या जागी नागपूर शहर पोलीस दलातील सह आयुक्त एस. टी. बोडखे यांची बदली करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस बल पुणे येथे कार्यरत असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार मेकला यांची नवी मुंबईच्या सहायक आयुक्तपदी आणि पोलीस मोटार परिवहन विभाग पुणे येथील विशेष पोलीस महानिरीक्षक एफ. के. पाटील यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरील अवघ्या 6 अधिकार्‍यांच्या बदल्या गृहमंत्रालयाने केल्या आहेत.

राज्य पोलीस दलामध्ये पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या 12 आयपीएस अधिकार्‍यांना बढत्या आणि अन्य 7 आयपीएस अधिकार्‍यांना नवीन जबाबदार्‍या दिल्या आहेत. यात मुंबईच्या मध्यप्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त एस. जयकुमार यांची सशस्त्र पोलीस बलात बदली करण्यात आल्याने रिक्त झालेल्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. शिसवे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी दहशतवादविरोधी पथक औरंगाबादचे पोलीस अधीक्षक एस. व्ही. कोल्हे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील असलेल्या परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांना अप्पर पोलीस आयुक्त पदावर बढती देत पश्‍चिम उपनगर प्रादेशिक विभागाची, तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना बढती देत राज्य दहशतवादविरोधी विभागात उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना बढती देत मुंबई शहरच्या वाहतूक शाखेत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 

राज्य राखीव पोलीस बलात कार्यरत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक संदीप कर्णिक यांची गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त पदावर वर्णी लागली असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या निशिथ मिश्रा यांच्यावर मुंबई पोलीस दलात संरक्षण व सुरक्षा विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हेशाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची नव्याने तयार करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तजागेवर नवी मुंबईचे पोलीस पोलीस उपायुक्त प्रविण पवार यांना अप्पर पोलीस आयुक्त पदावर बढती देऊन नेमणूक देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे पोलीस उपमहानिरीक्षक के. जी. पाटील यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पदावर नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या रिक्तजागी नवीन बढती मिळालेल्या नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक ए. बी. रोकडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अमरावती शहरचे पोलीस आयुक्त डी. वाय. मंडलिक यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्तजागेवर पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त संजय बावीस्कर यांना बढती देत अमरावती शहरचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त बी. जी. गायकर यांना अप्पर पोलीस आयुक्त पदावर बढती देत नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत आणि पुण्यातील राज्य राखीव पोलीस गट क्र. 1 चे समादेशक एस. बी. फुलारी यांना बढती देेऊन पुणे शहर पोलीस दलाच्या उत्तर प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात 
आली आहे.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक एस. व्ही. मोहीते यांना बढती देत नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे उपसंचालक पदावर, तर पोलीस प्रशिक्षण केंंद्र अकोला येथील प्राचार्य बी. जी. शेखर यांना बढती देत मुंबईतील राज्य राखीव पोलीस बलात उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनाही उपमहानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त पदावरील तब्बल 95 अधिकार्‍यांच्या बदल्या गृहमंत्रालयाने केल्या असून 10 नवीन पोलीस उपायुक्त मुंबईला मिळाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहर पोलीस दलाला 8, ठाणे शहर पोलीस दल आणि राज्य गुप्तवार्ता विभागाला प्रत्येकी 5, नागपूर शहर पोलीस दलाला 4 आणि नव्याने तयार होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह नवी मुंबई पोलीस आयुक्तालायला प्रत्येकी 2 पोलीस उपायुक्त मिळाले आहेत. 

मुंबई शहर पोलीस दलातील गुन्हेशाखेचे उपायुक्त निसार तांबोळी यांच्यावर वर्ध्याचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा मोठ्याप्रमाणात खात्मा केल्याने चर्चेत आलेल्या पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्हापूरचे अधीक्षक पदावर आणि त्याच्या रिक्त जागेवर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांचे परिसहाय्यक गौरव सिंग याची पालघरच्या पोलीस अधिक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे.