Mon, Aug 19, 2019 05:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीनियर पीआयला बढती, बदली आणि फिरलेली सूत्रे

सीनियर पीआयला बढती, बदली आणि फिरलेली सूत्रे

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:01AMमुंबई : अवधूत खराडे

राज्य पोलीस दलामध्ये बदल्यांचे वारे वाहत असतानाच अन्य अधिकार्‍यांसोबत मुंबईतील एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती देत त्यांची शहराबाहेर नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्रालयाने काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी करत राज्य पोलीस मुख्यालयाने त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमूक करण्याचे आदेशही मुंबई पोलिसांना दिले. त्यानुसार मुंबई पोलिसांनी त्यांना कार्यमूक्त करण्याचे आदेशही प्रसिद्ध केले. मात्र त्यानंतर सुत्रे फिरली आणि हा अधिकारी पून्हा त्याच विभागाचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलीस दलामध्ये समोर आला आहे.

मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणार्‍या समाजसेवा शाखेचे प्रमुख असलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गिड्डे यांच्यासोबत ही घटना घडली आहे. गृहमंत्रालयाने 8 जून रोजी त्यांना बढती देत, रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली. गिड्डे यांच्यासह राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या तब्बल 88 पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधिक्षक पदी बढती देत नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या.

गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य पोलीस मुख्यालयाने गिड्डे यांच्यासह अन्य पोलीस अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यरत पदावरुन कार्यमूक्त करण्याचे आदेश काढले. समाजसेवा शाखा ही गुन्हेशाखेच्या अख्त्यारीत येत असल्याने गिड्डे यांना कार्यमूक्त करण्याचे पत्र कक्ष तीनकडून गुन्हेशाखेच्या अप्पर आयुक्तांकडे आणि तेथून पूढे सहीसाठी सहआयुक्तांकडे पाठविण्यात आले. गिड्डे यांना पदावरुन कार्यमूक्त करण्याचे आदेश पोलीस पत्रकाद्वारे प्रसिद्धही आल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळते.

कार्यमूक्तीचे आदेश प्रसिद्ध होताच थेट गृहमंत्रालयातून सुत्रे फिरली. गिड्डे यांना पून्हा त्याच जागी बसविण्याच्या सूचना देणारा फोन आला आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांची भांबेरी उडाल्याचे समजते. सावरासावर करत अखेर गिड्डे यांना त्याच जागी नियुक्ती देण्यात आल्याने मुंबई पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. गिड्डे यांच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आणि गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

घटना काय सांगतात

वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांना सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधिक्षक पदी बढती देण्यापूर्वी त्यांची यादी (निवडसूची) जाहीर केली जाते. हरकती, सूचना मागविल्या जातात. बढतीनंतरचे पद हे पोलीस दलात तेवढ्या महत्वाचे मानले जात नसल्याने अनेक जण बढत्या नाकारतात. तरीही बढती होऊन एखाद्याने याआदेशाचे पालन केले नाही, तर त्या अधिकार्‍याची साईड ब्रान्चला बदली केली जात असल्याचे यापूर्वीच्या घटना सांगतात.

बदल्यांचे सेटींग

राजकीय वजन, बड्या व्यक्तींसोबत असलेली ओळख, वरिष्ठांची मर्जी आणि आर्थिक गणिते अशा वेगवेगळ्या युवधांचा वापर करुन होऊ घातलेल्या, झालेल्या बदल्या रद्द करुन हवे ते पोस्टींग मिळविण्याच्या घटना मुंबईसह राज्य पोलीस दलाला नवीन नाहीत. याचा प्रत्ययसुद्धा बदल्या आणि बढत्यांमध्ये वेळोवेळी केल्या जाणार्‍या फेरफारामधून समोर येतो. पोलीस उपनिरीक्षकापासून ते आयपीएस अधिकार्‍यांपर्यंत अनेक जण आपल्याला हवे ते पोस्टींग मिळविण्याचा प्रयत्न करतात. यात बरेचसे अधिकारी यशश्‍वी होतात, तर काहींच्या पदरी निराशा पडते.