'आयसीएमआर'च्या मुख्यालयात आलेल्या ‘त्या’ वैज्ञानिकाला कोरोना!

Last Updated: Jun 01 2020 7:03PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

​राजधानी दिल्लीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मुख्यालयात मुंबईवरून आलेल्या एका वैज्ञानिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यनंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या देशभरासह आयसीएमआर मुख्यालयातही कोरोना संसर्गाने शिरकाव केल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे. एखादा वैज्ञानिक कोरोनाबाधित आढळून आल्याचे देशातील बहुदा हे पहिले प्रकरण असावे, अशी चर्चा त्यामुळे रंगली आहे. आयसीएमआरच्या अधिनस्थ असलेल्या मुंबईतील इन्स्टिट्यूट फॉर रीसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे (एनआयआरआरएच) वैज्ञानिक दोन दिवसांपूर्वी दिल्ली मुख्यालयात महत्वाच्या बैठकीसाठी आले होते. सोमवारी संबंधित वैज्ञानिक कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळताच खबरदारी म्हणून आयसीएमआरच्या मुख्यालयात निर्जुंतीकरण करण्यात आले. 

आयसीएमआरच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनूसार, कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता देशभरात पसरलेल्या आयसीएमआर अधिनस्थ सर्व संस्थानी मिळून शोधकार्य सुरु केले आहे. दररोज त्यामुळे वैज्ञानिकांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. बैठकींमध्ये वेगवेगळ्या संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक सहभागी होत आहेत. संबंधित वैज्ञानिक बैठकीच्या निमित्ताने नुकतेच मुंबईवरून मुख्यालयात आले होते. बैठकीत आयसीएमआरचे अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. पंरतु, दोन ते तीन दिवसांनंतर या वैज्ञानिकामध्ये कोरोना संसर्ग आढळून आल्याची माहिती समोर आली. 

दरम्यान, वृत्तलिहेपर्यंत बैठकीत उपस्थित आयसीएमआरचा कुठलाही अधिकारी क्वॉरंटाईन झाल्यासंबंधी माहिती मिळू शकली नाही. तूर्त मुख्यालयाला निर्जुंतीकरण (फ्यूमिगेशन) करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांपर्यंत मुख्यालयात कार्यरत कर्मचारी घरूनच काम करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

नीती आयोगातील एक कर्मचारी कोरोनाबाधित 

सोमवारी नवी दिल्लीतील नीती आयोगाच्या मुख्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला. मुख्यालयातील तिसरा माळा त्यामुळे बंद करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांपर्यंत याठिकाणी निर्जुंतीकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली नगर परिषदेच्या (एनडीएमसी) आरोग्य विभागाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कर्मचारी कामावर येत नव्हते. संबंधित कर्मचार्याला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. पंरतु, सॅनिटायजेशनचे काम कार्यालयात सुरु करण्यात आले होते, अशी माहिती एनडीएमसीकडून देण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयात आग 

सोमवारी सकाळी नवी दिल्लीतील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयात आग लागली. सुचना मिळताच पाच अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले. निर्माण भवनाच्या इमारतीत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एका प्रिंटरमध्ये शॉर्टसर्किंटमुळे आग लागली होती. आगीमुळे आजूबाजूला ठेवण्यात आलेले संगणक, फोन जळाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अवघ्या १५ मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.