Thu, Aug 22, 2019 09:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराला पाठवा!

टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराला पाठवा!

Published On: Jun 05 2018 11:24AM | Last Updated: Jun 05 2018 11:25AMकचरा कुंडी संस्कृती - याचं मुख्य महत्त्व म्हणजे तरुण-तरुणींनी, विद्यार्थीवर्गाला शिकवणे व प्रोत्साहित करून ते वातावरण कसे स्वच्छ ठेवतील ते पाहणे. प्रत्येकाला स्वच्छ घरात राहणे नेहमीच आवडते. आपल्या भोवतीचा परिसर, रस्ते, उद्याने, समुद्रकिनारे, तळी, नद्या नेहमीच स्वच्छ राहतील याकडे कटाक्षाने पाहणे काळाची गरज आहे. आपण सहल काढतो, भोजनाचा आस्वाद घेतो; परंतु त्यानंतर अन्नाची पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, सर्वकाही वापरानंतर तेथेच फेकून देणे योग्य आहे का? कचराकुंडी संस्कृतीचे जर नियमितपणे पालन केले तर प्रत्येक जण ठरवून दिलेल्या कुंडीतच कचरा गोळा करतील, तर घाणीचे साम्राज्य होणार नाही.

►प्लास्टिकच्या पिशव्या अस्ताव्यस्त फेकू नका.

►प्लास्टिक कुठेही न टाकता साठवा व पुनर्वापरासाठी द्या.

प्लास्टिकचा पुनर्वापर

►पुनर्वापर करण्यापूर्वी प्लास्टिक प्रथम धुतले जाते, कोरडे केल्यानंतर यंत्रामध्ये टाकून त्याचा भुगा बनवतात व आवश्यकतेनुसार पाहिजेत्या वस्तू बनवल्या जातात. उदा.अन्न पाकिटं, चटया, बाकडी, खुर्च्या, रस्त्यावरील दुभाजक, टोपल्या वगैरे.

पुनर्वापराचे फायदे

►पुनर्वापरामुळे घनकचर्‍याची योग्य प्रकारे उपयोग होऊन, नैसर्गिक गोष्टींचा र्‍हास थांबतो, जंगलतोड कमी होते, झाडे वाचतात, त्यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होते.

►पुनर्वापरामुळे नवीन प्लास्टिक उपलब्ध करण्यासाठी लागणार्‍या पदार्थांचा वापर आपोआप कमी होतो. त्यामुळे इंधनाची बचत होते.

►लोकां ना रोजगार मिळण्यास मदत होते व जनतेला कमी खर्चात वस्तू उपलब्ध होतात.

►कागदाचा फक्‍त चार वेळाच पुनर्वापर करता येतो.

►प्लास्टिकच्या थैल्या धरणी व झाडांना अपायकारक आहेत का? याचं उत्तर नक्‍कीच नाही असेच येईल. कारण आजकाल नर्सरीमध्ये हजारो रोपे सुरक्षित वाढवता येतात; कारण प्लास्टिकमुळे तरुण रोपांना संरक्षण मिळते, कीटकनाशकाचा वापर टळतो, पाण्याचा दुरुपयोग होत नाही. जमिनीची धूप थांबते, खतांची मात्र योग्य प्रमाणात देता येते, त्यामुळे वातावरण चांगले राहण्यास मदत होते.

►प्लास्टिकपासून आजकाल अनेक गृहोपयोगी वस्तू बनतात, त्यामुळे जंगलांची तोड टाळली जाते.

►या सर्वावरून एकच दिसतं की, भारतात 60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत आहे ही पर्यावरणासाठी पोषक बाब आहे.

प्लास्टिकचा वापर विषारी संभवतो का?

►आज जगात सर्वत्र प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे; कारण त्यापासून मानवाला तसेच अन्य प्राण्यांना, जीवजंतूंना अपाय होत नाही. वैयक्‍तिक पातळीवर वापरल्या जाणार्‍या वस्तू, अन्नाची पाकिटे तसेच औषधाची वेष्टने सुरक्षित असतात.

►हृदयासाठी लागणार्‍या कृत्रिम झडपा, सांधे जोड इथेही गरज लागते. वरील सर्व गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लास्टिकचा सुळसुळाट आधुनिक व संगणकीय युगात मोठ्या प्रमाणात वाढत आहे व त्याला आळा घालणे शक्य नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे टाकाऊ प्लास्टिक सर्वत्र विखुरलेले दिसते व ते मानवाला कधीही नष्ट करू शकेल यात शंका नाही. प्लास्टिक वापर गैर नाही; परंतु पर्यावरण म्हणजे कचरापेटी समजून फेकणं चुकीचं आहे. त्यामुळे वसुंधरेला म्हणजेच पृथ्वीला अपाय होऊ शकतो. टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करुन पुनर्वापराला पाठवा.