Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोस्टल रोडवरून सेनेच्या कोंडीचा प्रयत्न

कोस्टल रोडवरून सेनेच्या कोंडीचा प्रयत्न

Published On: Apr 21 2018 1:34AM | Last Updated: Apr 21 2018 1:22AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

भाजपसोबत आता युती नाही, अशी शिवसेनेने जाहीर भूमिका घेतल्यापासून भाजपने आता आपल्या मित्रपक्षाची कोंडी करण्याची खेळी सुरू केली आहे. या खेळीचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडच्या वचनपूर्तीसाठी पावले उचलणार्‍या शिवसेनेला विविध प्रश्‍न उपस्थित करून भाजपने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये कोस्टल रोडचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे या रोडसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंसल्टन्सी नेमणुकीचा प्रस्ताव प्रशासनाने महिनाभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीत दाखल केला होता. यावर शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तो प्रस्ताव नियमानुसार मंजूर झाला. दरम्यान, गुरुवारी शिवसेनेने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. 

शिवसेनेचा कोस्टल रोडला विरोध आहे का, या प्रकल्पाबाबत स्टँडिंग कमिटीत अंडरस्टँडिंग न झाल्यामुळे कन्सल्टन्सीला विरोध होत आहे काय, असे सवाल उपस्थित करत शेलार यांनी या रोडबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले.

शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून कोस्टल रोडसाठीच्या वेगवेगळ्या 17 परवानग्या तातडीने मिळविल्या आहेत. त्यामध्ये मत्स्य आयुक्त, भारतीय नौदल, एमसीझेडएमए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीए, कोस्टगार्ड, मुंबई हेरिटेज कमिटी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट,  एमओईएफ, एचपीसी, हर्बर इंजिनीअर, मरिन ड्राईव्हची तीन सदस्यीय समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांच्या परवानग्यांचा समावेश आहे. 

आता या प्रकल्पासाठीचा सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत कोस्टल रोडच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंसल्टन्सी नेमणुकीचा हा प्रस्ताव शिवसेनेने दफ्तरी दाखल केला आहे. मुंबईकरांसाठी आवश्यक असलेला हा प्रकल्प जलदगतीने पुढे गेला पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. कोस्टल रोड लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी भाजप त्याचा पाठपुरावा करेल, असेही शेलार म्हणाले. दरम्यान, भाजपने उपस्थित केलेल्या सवालांवर शिवसेनेच्या वतीने काय उत्तर दिले जाते याची उत्सुकता आहे. 

Tags : Mumbai, Senas impasse, coastal road, Mumbai news,