Thu, Jun 27, 2019 12:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना पदकाचे मानकरी मेजर कौस्तुभ राणे

सेना पदकाचे मानकरी मेजर कौस्तुभ राणे

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:17AMठाणे : प्रतिनिधी

मूळचे कोकणातील वैभववाडी येथील राणे कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून मिरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राहतात. मेजर राणे यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 ला झाला. येथील होली क्रॉस स्कूलमधून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मिरा रोडच्या रावल महाविद्यालयातून बारावी आणि दहिसरच्या शैलेंद्र महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली.  त्यानंतर त्यांनी पुणे येथे लष्करी सेवा अभ्यासक्रम पूर्ण केला. 17 सप्टेंबर 2011 मध्ये ते लष्करात रुजू झाले. 2011 मध्ये त्यांची पहिली पोस्टींग कुपवाडा येथे झाली. अतिशय धाडसी काम करणारे राणे लेफ्टनंट, कॅप्टन आणि आता मेजर झाले. ते मूळचे 12 व्या गढवाल फलटणीत होते. सध्या ते 36 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते.

2014 मध्ये त्यांचा विवाह कनिकाशी झाला. त्यांना अगस्त नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर, आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत मुख्यधापिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. मंगळवारी सकाळी कौस्तुभ यांची आई, पत्नी, मुलगा गावाला जाण्यासाठी निघाले होते. दुपारी बाराच्या सुमारास ते खेडपर्यंत पोहोचले असताना ही दुःखद घटना राणे कुटुंबाला समजली आणि ते परत मिरा रोडच्या दिनेशने मागे फिरले. ही घटना कळताच हिरल इमारतीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक नागरिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह कौस्तुभ यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग, मित्रांची कुटुंबीयांची भेट घेतली. 

दहशतवाद्यांना धडा शिकवणे गरजेचे

ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. केवळ ठाण्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला शहीद मेजर राणे आणि त्यांच्या सहकारी जवानांचा अभिमान आहे. मेजर राणे यांना याच वर्षी काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईतील पराक्रमासाठी सेना पदकाने गौरवण्यात आले होते. त्यांचे हे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. सीमेवर सतत कुरापती काढणारा पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे पालकमंत्री शोकसंदेशात म्हणतात.