Mon, Aug 19, 2019 01:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेल्फीच्या नादात ४० विद्यार्थ्यांसह कलंडली बोट

सेल्फीच्या नादात ४० विद्यार्थ्यांसह कलंडली बोट

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:36AM

बुकमार्क करा
डहाणू : पुढारी वृत्तसेवा

सगळीकडे भोगी संक्रांतीची धूम असतानाच समुद्र सफारीला बोटिंग करीत जाणे पोंदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भलतेच महागात पडले. शनिवारी सकाळी पारनाका येथील समुद्रात  बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेजच्या 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्र सफारी करणारी बोट उलटून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर सहा विद्यार्थी बेपत्ता आहेत. 

सकाळी 11 च्या सुमारास बोट उलटल्याचे वृत्त पसरताच सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र तटरक्षक दल, मच्छीमार बांधव आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली. केवळ पोहता न आल्याने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांत जान्हवी हरेश सुरती रा. मसोली, सोनल भगवान सुरती, रा.मसोली, संस्कृती मायवंशी या तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. किमान सहा विद्यार्थी बेपत्ता असून, बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास मच्छीमार बांधव शनिवारी रात्री भरतीच्या वेळीही घेणार होते. त्यांचे मृतदेह धाकटी डहाणू ते झाई या किनार्‍यावर दोन दिवसांनंतर लागतील, असा अंदाज मच्छीमार संघाचे अध्यक्ष अशोक आंभिरे यांनी व्यक्‍त केला.     
 

बोटीच्या टपावर चढून सेल्फी घेताना बोटीचा तोल जाऊन बोट लवंडल्याने बोट बुडाल्याचे विद्यार्थी आणि बोटचालकाने सांगितले. 12 वीला शिकणारी आणि मोठ्या नशिबाने बचावलेली डेसी झाईवाला हिने सांगितले की, आम्ही 11 वी आणि 12 वीची वेगवेगळ्या ग्रुपची मुले बोटिंगसाठी गेलो होतो.बोट चालकाने  वर जाण्याचा धोका सांगितल्याने आम्ही मुले खालच्या सीटवर बसलो होतो. याचदरम्यान काही मुले सेल्फी काढण्यासाठी टपावर चढली. सेल्फीसाठी एकाच बाजुला मोठ्या संख्येने मुले जमा झाल्याने बोटीचा तोल गेला. बोट फायबरची असल्याने एका बाजूने वजन वाढल्याने कलंडली व काही क्षणात बुडाली. समुद्रात बोट उलटताच 9 विद्यार्थी पोहत सुखरुप बाहेर निघाले मात्र त्यांनी थेट घर गाठले. बोटचालक   सुरेश अंभिरे याने प्रसंगावधान राखत  जीवावर उदार होत बुडणार्‍या विद्यार्थ्यांना वर उचलून बोटीच्या टपावर पाठवण्याचे धाडस केल्याने अनेकांचे जीव बचावले. 

डहाणूकडे जात असताना सतीपाडा येथून काही लोकांनी विपरित प्रकार पाहून नंदकुमार विंदे यास  फोन केला. त्यानंतर चंदन मेहेरसह मोटरसायकल घेऊन ते  समुद्राकडे गेले. समोर बोट बुडताना दिसताच 700 मीटर खोल समुद्रात पोहत जात त्यांनी बुडालेल्या मुलांना बोटीवर चढवून अन्या बोटीतून किनार्‍यावर पाठवले.त्यानंतर समुद्रात जाळी मारुन घेतली.लाईफ जॅकेट दिले. बोटीखाली अडकलेल्या दोन विद्यार्थिनींना खेचून काढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघींना दवाखान्यात पाठवून उपचार सुरु केले.

विद्यार्थ्यांची बोट बुडाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने सर्व पालकांनी डहाणू किनारा गाठला. भयभीत पालक आणि रहिवाशांमुळे किनार्‍यावर एकच गर्दी उसळली होती. कोस्टगार्डने हॅलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. मच्छिमार बांधव,पोलिस प्रशासन ,नगरपरिषद कर्मचारी,लोकप्रतिनिधीआणि समाजसेवकांनी तत्परतेने मदत केल्यामुळे शोधकार्याला गती मिळाली.

विद्यार्थ्यांची बहादुरी

दुर्घटना घडली तेव्हा कोस्ट गार्डकडे स्पीड बोट उपलब्ध नव्हत्या. स्थानिक कोळीबांधवानी सर्वप्रथम बचावकार्य सुरू केले. पोंदा कॉलेजमधील विद्यार्थी पवन गणेश धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मंगेला (रा. डहाणू, मंगेलवाडा) आणि भाविक दवणे (रा. धाकटी डहाणू) या विद्यार्थ्यांनी किनार्‍यावरून सुमारे दोन नॉटिकल एवढ्या अंतरापर्यंत बोटीने जाऊन बचावकार्य सुरू केले. त्यानंतर डहाणू व धाकटी डहाणू, आगर  येथील कोळी बांधवानी प्रशासनाच्या आधी पोहोचून बचावकार्य केले. त्यामुळे 32 मुलांचे जीव वाचले. कोस्टगार्डच्या दोन्ही बोटी इंजीन बिघडल्यामुळे बंद अवस्थेत आहेत. यावेळी मेरिटाईम बोर्डाची एक बोट मागवण्यात आली. स्थानिक 15 मच्छीमारांनी आपल्या बोटी बचावकार्यात जुंपल्या. प्रशासनाच्या हतबलतेवर मच्छीमारांनी संताप व्यक्त केला.

डहाणू दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून शोक!

डहाणूजवळच्या समुद्र किनार्‍यावर विद्यार्थ्यांची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले असून संबंधित यंत्रणेला मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबईजवळच्या किनारपट्टीवर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. डहाणूच्या के.एल. पोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नेणारी बोट उलटून झालेल्या अपघातात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले आहे.  या दुर्घटनेतील बाधित विद्यार्थ्यांना कुटिर रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत विद्यार्थ्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून या अपघातातील मृत अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.