Sat, Jul 20, 2019 08:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुरक्षा रक्षक मंडळ मोडीत काढणार? 

सुरक्षा रक्षक मंडळ मोडीत काढणार? 

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:33AMमुंबई : अशोक ननावरे

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना 2002 मध्ये काही सुधारणा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असून यासंदर्भात अंमलबजावणी करताना खासगी सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक तैनात करणार्‍या अस्थापना यांना मंडळात नोंदीत होण्यापासून सूट देण्याचा शासनाचा इरादा आहे. असे झाल्यास मंडळातील मालक व सुरक्षा रक्षक यांची नोंदणी थांबेल. पर्यायाने कामकाज ठप्प होवून मंडळच मोडीत निघण्याचा धोका आहे.

राज्य शासनाने माथाडी कायदा 1969 च्या धर्तीवर 29 जून 1981 रोजी ‘महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण)अधिनियम 1981’ या नावाने एक अध्यादेश पारित केला. यानंतर 16 जुलै 1981 रोजी सदर अधिनियमांतर्गत तरतुदीनुसार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरिता या मंडळाची स्थापना झाली. यापूर्वी खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांची पिळवणूक केली जात होती. बारा-बारा तास काम करण्याबरोबरच प्रॉव्हीडंट फंड, ग्रॅज्युएटी, बोनस, ओव्हरटाईम आदी सुविधा दिल्या जात नव्हत्या. सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळातील सुरक्षा रक्षकांना आठ तास कामाबरोबरच वर उल्लेख केलेल्या सर्व सुविधा मिळू लागल्या. 

मंडळास आज 35 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. राज्यात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीजनी सुरक्षा रक्षक कायद्याच्या वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेे होते. सर्वोच्च न्यायालयाने 28 फेब्रुवारी 1987 रोजी दिलेल्या एका निकालाच्या अनुषंगाने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील काही खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीजना शासनाने काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मार्च 1990 मध्ये सूट दिली. मात्र हायकोर्टाने राज्य शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने एजन्सीजना नाही तर त्यांच्याकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांना सूट दिली जावू शकते, असा निर्णय दिला. तसेच अधिनियमात योग्य ती सुधारणा करुन नवीन सूट देण्याबाबत राज्य शासनाने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.

सध्या राज्य शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरिता यांचे कामकाज योग्य रितीने व सुरळीतपणे सुरु आहे. आज मंडळाकडे सुमारे 25 हजार सुरक्षा रक्षक नोंदीत आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीस अशोक पाटील, चंद्रकांत बोबडे, गणपतराव हुमणे, अशोक कळसकर, के.टी. भोसले, हणमंतराव सुरवसे, आदी उपस्थित होते.