Sat, Mar 23, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील १२ हॉटेल्सना सील; ३१९ सिलिंडर्स जप्त

मुंबईतील १२ हॉटेल्सना सील; ३१९ सिलिंडर्स जप्त

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:27AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील हॉटेलच्या तपासणी मोहिमेंतर्गत पालिकेने गेल्या दोन दिवसांत 795 हॉटेल व उपाहारगृहांची तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली 12 हॉटेल सील करण्यात आली आहेत. तर विविध हॉटेलमधील 319 बेकायदेशीर सिलिंडर जप्‍त करण्यात आले. 

मुंबईतील हॉटेल व उपाहारगृहांमधील अनियमिततांची तपासणी करण्याचे काम महापालिकेने व्यापक स्तरावर सुरु केले आहे. पालिकेच्या 24 विभागांमध्ये पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांच्या 52 गटाद्वारे ही तपासणी सुरु आहे. या प्रत्येक गटामध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी यांचा समावेश आहे. अग्निसुरक्षाविषयक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान सील ठोकण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एम पूर्व विभागातील 4, जी दक्षिण व एच पश्चिम विभागात प्रत्येकी तीन आणि बी व एन विभागात प्रत्येकी 1, याप्रमाणे 12 उपाहारगृहांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान 135 ठिकाणी आढळून आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त 438 उपाहारगृहांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या तपासणी दरम्यान उपहारगृहातील अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी अग्निशमन दलाद्वारे तर आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांद्वारे करण्यात येते. तसेच इमारतीमधील बांधकाम विषयक बाबी, प्रवेशद्वार, मोकळी जागा आदींची तपासणी इमारत व कारखाने या खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांद्वारे करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. 

दरम्यान काही प्रमाणात हॉटेलमध्ये अनियिमितता आढळल्यास त्याबाबत महापालिकेच्या संबंधित नियम व पद्धतीनुसार नोटीस देऊन निर्धारित कालावधीत अपेक्षित बाबींची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. पण तपासणीदरम्यान अनधिकृत बांधकामे व दरवाजे बंद करण्यात आल्याचे आढळल्यास तात्काळ तोडक कारवाई केली जात आहे. एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यास हॉटेल तात्काळ सील करण्यात येत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.