Tue, Oct 22, 2019 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक प्रशिक्षणाने शाळा विस्कळीत

निवडणूक प्रशिक्षणाने शाळा विस्कळीत

Last Updated: Oct 10 2019 1:29AM
मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक ड्युटीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ऐन परीक्षेच्या काळात शाळांचे कामकाज कोलमडले आहे. प्रत्येक शाळांतील बहुतांश शिक्षक आणि कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी बाहेरच असल्याने त्याचा थेट परिणाम शाळांवर होत असल्याची तक्रार शिक्षक करत आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने याचा परिणाम बुधवारी होणार्‍या परीक्षांवर झाला असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. अनुदानित शाळांतील अनेक शाळांनी उपलब्ध कर्मचार्‍यांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या. मात्र, अनेक शाळांनी परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दिवाळी सुटीपुर्वी परीक्षा न संपल्यास एकाच दिवशी दोन पेपर घेउन परीक्षा घेण्याचा विचार शिक्षक करत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक कामासाठी शिक्षकांना महात्मा गांधी जयंती दिनी, 6 ऑक्टोबर आणि दसरा या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निवडणूक प्रशिक्षण आयोजित केले होते. या तिन्ही सार्वजनिक सुट्यांवर पाणी फिरले असतानाच पुन्हा 13 तारखेला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 21 तारखेला मतदान होणार असल्याने हा दिवसही निवडणूक कामात जाणार आहे.

आतापर्यंत शिक्षकांना हक्काच्या तीन सुट्टयांना मुकावे लागले आहे. तसेच पुढील रविवारी प्रशिक्षण आणि मतदानाचा दिवसही निवडणूक कामात जाणार आहेत.