Tue, Jul 16, 2019 01:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळकरी मुले गुन्हेगारीच्या आहारी

शाळकरी मुले गुन्हेगारीच्या आहारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गुन्हेगारांच्या वाढत्या दहशतीमुळे भांडुपकर भीतीच्या सावटाखाली जीवन जगत असतानाच शाळकरी मुले गुन्हेगारीकडे वळून नशेच्या आहारी जात असल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. राजकीय वरदहस्त आणि पोलिसांशी लागेबांधे असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात आवाज उठविण्यास किंवा पोलिसांत तक्रार करण्यास ते धजावत नसून न्याय मागावा तर कोणाकडे, या विवंचनेत अडकले आहेत.

विभागातील अनधिकृत बांधकामे आणि उभे राहात असलेले बांधकाम प्रकल्प यांना अवैधरीत्या संरक्षण पुरविण्यासाठी, तसेच विभागात आपली दहशत कायम ठेवण्यासाठी येथे उदयास येत असलेले झोपडपट्टी दादा आणि भाई शाळकरी मुलांना टार्गेट करत आहेत. कमी पैशांमध्ये ही मुले त्यांना सहज उपलब्ध होता. रोजचे शंभर, दोनशे रुपये देऊन त्यांना नशेची आणि भाईगिरीची सवय लावून दिली जात आहे. त्यांना या मुलांच्या भविष्याबाबत काहीच चिंता नाही. नशेमध्ये असलेली ही मुले नंग्या तलावरी घेऊन सांगितलेल्या विभागांमध्ये एन्ट्री मारतात.

दहशत माजविण्यासाठी सांगण्यात आलेल्या चाळीतील घरासमोरुन खिडक्यांच्या ग्रीलवर तलवारी ओढून आल्यानंतर या मुलांना गुंडांकडून पैसे दिले जातात. यातूनच विभागातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या येथील एका गुरवाच्या अल्पवयीन मुलांच्या गँगचा दबदबा आहे. याच गँगने गेल्या आठवड्यात बटन नावाच्या नशेसाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्या खाऊन एकाचा निर्घृण खून केला. पोलिसांनी या अल्पवयींन मुलांना ताब्यात घेतले असून, गुरवच त्यांना सोडविण्यासाठी वकिलांवर खर्च करत असल्याची माहिती मिळते. 

भांडूपमधील शाळांमध्ये आठवी ते दहावीमध्ये शिकत असलेली मुले आतापासूनच गुन्हेगारीकडे वळत आहेत. काही मुले तर नशेच्या आहारी गेली असून या परिसरातील अन्य शाळांतील मुलांशी वाद घालून दुश्मनी करत आहेत. वाद विकोपाला गेल्यांतर मारहाण करण्यासाठी मदतीला परिसातील भाई म्हणून वावरत असलेली पोरं जात आहेत. माझा मुलगा यातून वाचला पण, असे अनेक भांडुपकर पालक सांगतात. 

येथील पालक गुन्हेगारांच्या दबाबामुळे पोलिसांत तक्रारही करु शकत नाहीत. गुन्हेगारांच्रा भीतीमुळे शिक्षकही यात लक्ष घालत नसल्याने मुलांच्या भविष्याबाबत एका बापाने चिंता व्यक्त करत दै. पुढारीकडे आपली व्यथा मांडली आहे.

एका बापाची व्यथा...

भांडुपच्या खडीमशीन परिसरात असलेल्या एका शाळेतील गुंड प्रवृत्तीची मुले एका मुलाला मारहाण करत होती. मुलाला मारहाण होताना बघून याच शाळेतील एका मुलाने त्याला मारु नका, असे मारहाण करणार्‍या मुलांना सांगितले. मारहाण करणार्‍या मुलांनी मध्यस्थी करत असलेल्या मुलालाही आपला हिसका दाखवला होता. मात्र त्याचे वडील एका पक्षाचे जुने कार्यकर्ते असल्याचे त्यांना माहिती होते. अखेर शाळा सुटल्यानंतर मारहाण करणार्‍या मुलांनी मध्यस्थी करणार्‍या मुलाचे घर गाठले. तुमचा मुलगा आमच्या विषयात पडतो, त्याला समजवा. तुम्हाला आम्ही ओळखतो म्हणून शेवटचे सांगायला आलो आहे, असे या मुलांनी त्यांना बजावले. 

धास्तावलेल्या बापाने मुलाला समोरच बोलावून घेत विचारणा केली. बाबा मी काही नाही केले. फक्त तुम्ही उगाच त्या मुलाला मारु नका, असे बोललो होतो, असे त्या मुलाने वडिलांना सांगितले. मुलाचे हे शब्द ऐकताच जाब विचारण्यासाठी आलेल्या मुलांनी हे चुकीचे आहे. आमच्यामध्ये पडायचे नाही, असे या मुलाला आणि त्याच्या वडिलांना सांगून तेथून निघून गेले. मुलावर काही अनुचित प्रसंग ओढावणार नाही ना?या भीतीने वडिलांनी शाळा गाठली. शाळेतील शिक्षकांच्या कानावर हा प्रकार घातला. 


  •