Sun, Feb 24, 2019 00:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्कूल बसचालकाचा पालकावर हल्ला

स्कूल बसचालकाचा पालकावर हल्ला

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:16AMबदलापूर : वार्ताहर

आपल्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याबद्दल बसचालकाला जाब विचारण्यास गेलेल्या पालकावर संबंधित बसचालकाने अन्य पाच साथिदारांच्या मदतीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बदलापुरात घडली. या घटनेमुळे स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बदलापूर पूर्वेतील सुर्यानगर भागात राहणारे मंगेश तारोळे पाटील यांचा आठ वर्षांचा मुलगा गुरूकुल इंटरनॅशनल शाळेत दुसरीत शिकतो. त्याच्यासोबत स्कूल बसचालक रवी लव्हाटे लैंगिक अत्याचार करायचा. ही बाब पीडित मुलाने तारोळे पाटील यांच्या कानावर घातली. त्यानंतर तारोळे पाटील यांनी बसमालकाकडे तक्रार केली. त्यावेळी बसमालकाने असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यानंतरही पीडित मुलाला लव्हाटे त्रास देत असल्याने तारोळे पाटील यांनी मुलाची बस बदलली. बस बदलल्यानंतरही लव्हाटे पीडित मुलाला धमकवायचा.

याबाबत लव्हाटेला जाब विचारण्यासाठी तारोळे पाटील बुधवारी संध्याकाळी बदलापूर पूर्वेतील वात्सल्य हॉस्पीटल येथे गेले. यावेळी लव्हाटेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर लव्हाटेने तारोळे पाटील यांना 5 साथिदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यात गंभीर  जखमी झालेल्या तारोळे पाटील यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तारोळे पाटील यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री उशिरा लैंगिक अपराध तसेच बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार बसचालक रवी लव्हाटे, यश लव्हाटे, अक्षय कोरडे व भीमदेव राठोड यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

याबाबत गुरूकुल इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क केला असता, शाळेचे संचालक हितेंद्र नायक यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले. असा प्रकार झाला असल्यास हा दुर्दैवी आहे. मात्र, अशा प्रकाराची कोणतीही तक्रार आमच्याकडे नव्हती. तक्रार असती तर वेळीच कारवाई केली असती, असे व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, तारोळे पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापनाने बस कंत्राटदाराला बोलावून चालक व सहकार्‍याला तात्काळ कामावरून कमी केले. मात्र, प्रत्येक बसमध्ये महिला सहाय्यक असतात. त्यामुळे असा प्रकार होणे अशक्य आहे, असे नायक यांनी स्पष्ट केले.