Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ५० टक्केच रक्कम?

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ५० टक्केच रक्कम?

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:32AMठाणे : दिलीप शिंदे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती लागू केली असताना अनेक शिक्षण संस्थांनी मराठा विद्यार्थ्यांकडून 100 टक्के शिक्षण शुल्क वसूल केले आहेत. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाने आवाज उठवल्यानंतर राज्य शासनाने 6 सप्टेंबर रोजी आणखी एक परिपत्रक काढून शिक्षण संस्थांनी तातडीने 50 टक्के शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्दैवाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या त्या परिपत्रकात अनेक गंभीर चुका असून योजनेच्या नावासह परत करण्यात येणारी रक्कमही चुकीची नमूद केली आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांची पुन्हा अडवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या ऐतिहासिक 58 मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये मराठा आरक्षणासह विविध शैक्षणिक मागण्यांचा समावेश होता. त्या मागण्यांची पूर्तता करताना राज्य सरकारने 7 ऑक्टोबर 2017 रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. या योजनेत मराठा विद्यार्थ्यांचा कुठेही उल्लेख नसल्याने या योजनेचा राज्यातील सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना लाभ मिळू लागला आहे. ही योजना 2017-18 ला लागू केली असली तरी 2018-19 पासून  या योजनेंतर्गत उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढविण्यात आली. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी प्रवेशाच्यावेळी 100 टक्के शिक्षण शुल्क आकारू नये, अशा वारंवार आदेश काढले. 

मात्र त्या आदेशांना केराची टोपली दाखवत अनेक संस्थांनी विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी वसूल केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शिक्षण विभाग, आरक्षण उपसमितीस ही बाब निदर्शनात आणून दिली. विद्यार्थ्यांच्या तक्रारी व  पुरावे सादर केल्यानंतर जागे झालेल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 6 सप्टेंबरला नवीन परिपत्रक काढून शिक्षण संस्थांना 50 टक्के शुल्क तातडीने विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्यातील रक्कम ही ऑक्टोबरमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गंभीरबाब म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा अभ्यास केल्यानंतर गंभीर चुका आढळल्या आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेऐवजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती असे नमूद केले आहे. एवढेच नाही तर शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काची 50 टक्के रक्कम परत करण्याऐवजी 100 टक्के रक्कम परत करण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या त्रुटीचा फायदा शिक्षण संस्थांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.