Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा ८ लाख

शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा ८ लाख

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:27AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा (क्रिमीलेयर) सहा लाख रुपयांवरून वाढवून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी घेतला. याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणातून स्वयंरोजगार पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने राज्यातील 2 लाख 88 हजार तरुण-तरुणींना विविध 24 अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात 26 जानेवारीपासून करण्याचे निर्देश आज झालेल्या सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात स्थापलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दिले.

मराठा समाजाच्या मागण्या मागीॅ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. या समितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा सहा लाखावरून 8 लाख रुपये करण्यास उपसमितीने मंजुरी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेनुसार केंद्र सरकारने राज्यातील कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी 188 कोटी रुपये दिले आहेत. या योजनेतून राज्यातील सुमारे 2 लाख 88 हजार तरुण-तरुणींना विविध 24 अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासंबंधी सर्व पूर्तता झाली असून येत्या 26 जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.