Sat, Mar 23, 2019 12:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एटीएममध्ये स्कीमर लावून रोकड लंपास

एटीएममध्ये स्कीमर लावून रोकड लंपास

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMनालासोपारा ः वार्ताहर

 वसई पश्चिमेत एचडीएफसी बँक ग्राहकांची फसवणूक बँकेच्या एटीएम केंद्रातच स्कीमर उपकरण लाऊन झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीच्या दिवशीच बँक ग्राहकांना हॅकरने चुना लावला. बँकांनी एटीएम मधील सुरक्षारक्षक काढल्याने बँक खात्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसई पश्चिमेत अंबाडी रोडवर एचडीएफसी बँक आहे. गेल्यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीला पाडव्याच्या दिवशी बँकेला लागून असलेल्या एटीएम केंद्रात एका टोपी घातलेल्या अनोळखी व्यक्तीने कार्ड क्लोनिंग उपकरण लावल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले. या माध्यमातून अनेक खातेदारांना गंडा घालण्यात आला असून फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 53 ग्राहकांनी आतापर्यंत तक्रारी नोंदवल्या आहेत. 

जवळपास चार महिन्यानंतर हॅकर्सने कार्डाचे क्लोनिंग करून नवीन कार्ड तयार करून त्यांनी बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एटीएम केंद्रातील यंत्रात स्कीमर उपकरण नकळतपणे बसवले जाते. त्यानंतर जो ग्राहक एटीएम यंत्रात आपले कार्ड टाकतो, त्याचा तपशिल या स्कीमर उपकरणात नोंदवला जातो. अगदी पासवर्ड देखील उमटतो. त्यानंतर या तपशिलाच्या आधारे कार्डाचे क्लोनिंग केले जाते, असे पोलिसांनी सांगितले.