Wed, Apr 24, 2019 08:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शालेय गणवेशाचे पैसे बँक खात्यावर योजना गुंडाळली

शालेय गणवेशाचे पैसे बँक खात्यावर योजना गुंडाळली

Published On: Jun 30 2018 1:43AM | Last Updated: Jun 30 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

गणवेश खरेदीची पावती अगोदर दाखवल्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणारे पैसे खात्यावर देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आता मागे घेतला आहे. शाळा सुरु होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर हा निर्णय बदलून राज्यातील लाखो गोरगरीब पालकांना त्रास देण्याचे अजब काम परिषद करत आहे. पैसे मिळणार म्हणून आता गणवेश खरेदी केलेल्या पालकांनी काय करायचे असा सवाल या पालकांकडून उपस्थित होत आहे.      

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून एमपीएसपी कडून यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन केले जात होते. गेेल्यावर्षी गणवेशाचे पैसे खात्यावर देण्याचा अजब निर्णय घेतला होता. बहुतांश विद्यार्थ्यांची बँक खातीच निघाली नसल्याने हा निर्णय फसला. त्यानंतर खरेदीची पावती दाखवेल त्या पालकांना गणवेशाचे पैसे तत्काळ देण्याचा निर्णय झाला. याची अंमलबजावणीही अनेक शाळांत सुरु झाली असताना.

आता पुन्हा शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेश खरेदीचा निर्णय आता देण्यात आला आहे. ज्या पालकांनी खात्यावर पैसे मिळणार म्हणून गणवेश खरेदी केले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक रद्द करत आता समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्याना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात यावेत असे आदेश  महाराष्ट्र प्राथमिक परिषदेच्या संचालक पदाचा अतिरिक्‍त भार घेतलेल्या शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी गुरुवारी दिले आहेत.  36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांच्या गणवेशाची तरतूद केली होती त्यातील पहिल्या टप्यात 35 हजार 60 हजार 680 लाभार्थ्यांकरिताच निधीची तरतूद मंजूरी मिळाल्याची माहितीही या परिपत्रकात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. योजनांमध्ये होणार्‍या गैरव्यवहारावर आळा घालण्यासाठी शासनाने थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान (डीबीटी) देण्याचे धोरण अवलंबिले. एकूण दोन गणवेशासाठी 600 रुपये गणवेशाचा निधी डीबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार होता. परंतु डीबीटीमार्फत विद्यार्थी व पालकाच्या संयुक्त खात्यात सदर रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.

डीबीटीच्या आग्रहामुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहीले. विद्यार्थ्यांना बँकेचे खाते उघडण्यासाठी 500 रूपये लागतात. परंतु त्यांना गणवेशापोटी 600 रूपये दिले जात होते. त्यातच अनेक शुल्काच्या नावावर गणवेशासाठी आलेले पैसे बँकानी कपात करुन घेतले. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहीले. यावर मे मध्येच निर्णय अपेक्षित होता. शाळा सुरुवातीलाअगोदर गणवेश खरेदीची पावती दाखवल्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणारे पैसे खात्यावर मिळणार आहेत अशा सूचना दिल्याने अनेक पालकांनी गणवेश खरेदी केले असल्याचेही अनेक शाळांचे म्हणणे आहे.