Wed, Sep 19, 2018 10:34



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७० हजार कोटींचा तुटवडा! 

७० हजार कोटींचा तुटवडा! 

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:43AM



मुंबई : वृत्तसंस्था

200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात तब्बल 70 हजार कोटी रुपयांची चलन टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती एसबीआय रिसर्चने आपल्या अहवालात दिली आहे. या नोटा भरण्यासाठी अनेक एटीएम बंद झाल्याने चलन टंचाईच्या झळा निर्माण झाल्याचे यात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. 200 रुपयांच्या नोटांची वेगाने छपाई केल्यास चलन टंचाई लवकर दूर होईल, असेही यात म्हटले आहे.

चलन तुटवडा नसल्याचा दावा केंद्र सरकार आणि आरबीआयतर्फे केला जात असला, तरी संपूर्ण यंत्रणेत तब्बल 70 हजार कोटी रुपयांच तुटवडा असल्याची धक्‍कादायक माहिती एसबीआय रिसर्चने दिली आहे.चलन तुटवड्यामुळे देशभरात गोंधळ सुरू असताना हा रिसर्च रिपोर्ट आला आहे. मार्च 2018 अखेरपर्यंत 19.4 ट्रिलियन रुपयांचे चलन आवश्यक होते. प्रत्यक्षात 17.5 ट्रिलियन चलनच उपलब्ध असल्याचे या अहवालात म्हटले आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण फक्‍त 1.2 ट्रिलियन असल्याचा फटकाही बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत 15 हजार 291 अब्ज रुपये एटीएममधून काढण्यात आले. त्यानंतरच्या सहा महिन्यांत 12.2 टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. चलन तुटवड्यामुळे नोटा बंदीच्या वेळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा मात्र फेटाळून लावण्यात आला आहे.

चलन तुटवड्याचा उगम दक्षिणेतून 

सध्या चलन तुटवड्याचा उगम आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एफआरडीआय विधेयकामुळे बँकांतील पैसा सुरक्षित नसल्याची अफवा या राज्यांमध्ये पसरली आणि तेथून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेण्यात आला.