Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपंग शिक्षक समायोजन प्रक्रियेत घोटाळा

अपंग शिक्षक समायोजन प्रक्रियेत घोटाळा

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे जिल्हापरिषदेच्या शाळेत समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. बनावट नियुक्ती पत्राच्या आधारावर नोकरी मिळविणार्‍यांचा शोध घेण्यासाठी 2010 पासूनच्या शिक्षक व परिचारकांच्या नियुक्ती पत्रांची चौकशी करण्यात यावी.चौकशीत दोषी आढळणार्‍यांना तात्काळ कामावरून कमी करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागचे सचिव असीम गुप्ता यांनी दिले आहेत.

अंपग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबर शिक्षण देऊन त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात युनिसेफच्या मदतीने केंद्रपुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना राबवण्यात येत होती. ही योजना 2009-10 पासून केंद्र शासनाने बंद केली आहे.  त्यामूळे या योजनेंतर्गत कार्यरत असणारे 595 विशेष शिक्षकांना व परिचरांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेत रिक्त पदावर सामावून घेण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा जिल्हा परिषद नाशिक, धुळे , जळगांव, नंदुरबार व पालघर यांना प्राप्त झालेल्या नियुक्ती पत्रानुसार शिक्षक व परिचरांचे जिल्हा परिषद शाळांत समायोजन करण्यात आले आहे. 

पालघर जिल्हा परिषदेस शिक्षक भरती समायोजन प्रक्रियेबाबत प्राप्त झाल्येल्या नियुक्ती पत्रांची चौकशी केली असता, सदरची पत्रे अनधिकृत व बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. अपंग एकात्मिक शिक्षण भरती समायोजन प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता 2010 पासून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेतलेल्या शिक्षक व परिचरांची नावे सर्व जिल्हा परिषदांकडुन प्राप्त करुन घेऊन सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.