Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मैलाच्या दगडांचे होणार जतन!

मैलाच्या दगडांचे होणार जतन!

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

ब्रिटीश राजवटीतील मैलाच्या दगडांचे जतन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.  मुंबईत 15 दगडांपैकी 10 दगड शिल्लक राहिले असून त्यांना वारसा जतन समितीने ग्रेड-1 चा दर्जा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह देशी-विदेशी पर्यटकांना सुमारे 180 वर्षापुर्वीचे मैलाचे दगड पाहता येणार आहेत. 

ब्रिटीश राजवटीमध्ये दक्षिण मुंबईतील सेंट थॉमस कॅथट्रल चर्च, हॉर्नीमल सर्कल, फोर्ट येथे शुन्य मैल प्रमाणित करून तेथून प्रत्यक मैलावर दगड रोवण्यात आले. सुमारे 1837 मध्ये बसवण्यात आलेले हे दगड सध्या रस्त्याखाली गाडले गेले आहेत. हॉर्निमल सर्कल ते सायन पर्यंत 15 दगड बसवण्यात आले असून यातील 5 दगड नष्ट झाले आहेत. तर दहा दगड आजही अस्तित्वात आहेत. या मैलांच्या दगडांचे जतन करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मैलाच्या दहडांचे जतन, संवर्धन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

 या 10 दगडापैकी शिवडी डॉ. एस. एस. राव मार्गावरील मैलाच्या दगडाचा जीर्णोद्वार करण्यात आला. याच धर्तीवर अन्य 9 दगड रस्त्याबाहेर काढण्यात येणार आहेत. हे दगड प्रदुषित हवेमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे दगड स्वच्छ करून त्याभोवतीचा परिसर कोबाल्ट स्टोन बसवून सुशोभित करण्यात येणार आहे. तर अस्तित्वात नसलेल्या मैलाच्या दगडाची बेसॉल्ट दगडामध्ये अथवा अन्य टिकाऊ वस्तूमध्ये प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. या कामासाठी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.