होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावरकर गौरव प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

सावरकर गौरव प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

Last Updated: Feb 27 2020 2:38AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य विधिमंडळ अधिवेशनातील विधानसभेचा तिसरा दिवस गाजला तो सावरकरांच्या मुद्यावरून. विधानसभेत बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांचा  गौरव प्रस्ताव सभागृहाने संमत करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली. मात्र त्या प्रस्तावात आक्षेपार्ह विधान असल्याने तो प्रस्ताव नियमात बसत नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तो फेटाळला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधीपक्षाच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला.

काही लोकांनी सावरकरांची निंदा केली आहे. असे काही लोक आहेत की त्यांचे देह वेगळे आणि त्यांच्या डोक्यावर आणि मेंदूवर दुसर्‍यांचे नियंत्रण आहे, असे विधान मुनगंटीवार यांच्या प्रस्तावात होते. ते विधानसभेच्या नियमाला धरून नव्हते. ते नियमात कसे बसते असा सवाल अध्यक्ष पटोले यांनी केला तेव्हा नियमांचे पुस्तक वाचून मुनगंटीवार यांनी सभागृहात समर्थन करण्याचा प्रयत्न केला. 

विधानसभा नियमाच्या पुस्तकाचे पान क्रमांक 14 वरील नियम 23/1 प्रमाणे हा ठराव मांडता येतो, असे ते म्हणाले. तर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी उभे राहून पुन्हा नियमाचे पुस्तक वाचून दाखवले. भुजबळ म्हणाले, नियम 23/2 ब असे सांगतो की, एखाद्या ठरावात वक्रोक्तीपूर्ण अथवा अवमानकारक शब्दप्रयोग करण्यात आले असतील तर तो ठराव नियमात बसत नाही, त्यामुळे तो सभागृहात मांडता येत नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांचे त्या ठरावातील ते शब्द काढावेत आम्हाला काहीही अडचण नाही. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकात सावरकरांना बलात्कारी आणि माफीवीर असे म्हटल्याचे सांगत या मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली आणि गोंधळाला सुरूवात झाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सावरकरांबाबत असे मासिकातील दाखले देत अवमानकारक विधाने सभागृहात करून त्यांची बदनामी केली जावू नये असा चिमटा फडणवीस यांना काढला. सभागृहातील गोंधळ थांबत नाही हे पाहताच अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळल्याचे सांगत पुढील कामकाज पुकारले.

मात्र सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव विधानसभेने करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला.  या गोंधळातच सभागृहाचे कामकाज सुरू झाल्याने संतापलेल्या विरोधीपक्षाने अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठिय्या देत मग समांतर सभागृह सुरू करत भाषणबाजी केली.

फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकात सावरकर यांच्या नावाची बदनामी केल्याने त्या मासिकावर बंदी घालण्याची मागणीही केली. सावरकरांच्या गौरव प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात सावरकरांना बलात्कारी म्हटले आहे, माफीवीर म्हटले आहे, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटतेय. सावरकरांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपला सुनावले. भाजपने जो प्रस्ताव मांडला, त्याची तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊन सभागृहाचे कामकाज सुरु करावे. नितेश राणे यांंचेही मत या प्रस्तावाबाबत घ्यावे. त्यांना तसा प्रस्ताव मांडायला सांगा. त्याहून पुढे सांगतो, सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही मांडतो, तुमचा आणि मोदी साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असे अनिल परब म्हणाले.

अध्यक्षांनी गदारोळातच लक्षवेधी सूचना पुकारल्या. महिला अत्याचारासंबधातील लक्षवेधी आणि विधेयके यावेळी मांडण्यात आली. यावेळी भाजपचे सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत घोषणा देत होते. त्यानंतर मोकळ्या जागेत या सदस्यांनी ठाण मांडले. या गदारोळातच लक्षवेधीला गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी उत्तर दिले. पाच विधेयकेही संमत झाली. त्यानंतर अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे जाहीर केले. 

विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव संमत करावा आणि काँग्रेस पक्षाच्या शिदोरी मासिकावर बंदी घाला अशी मागणी लावून धरली. अध्यक्षांनी फडणवीस यांची सूचना अस्वीकृत करताच संतप्त भाजप सदस्यांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. सावरकर यांची बदनामी करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणेचा फलक फडकवीत हे सदस्य अध्यक्षांपुढे आले.