Wed, Apr 24, 2019 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई जलसमृद्धीच्या जवळ पोहोचली!

मुंबई जलसमृद्धीच्या जवळ पोहोचली!

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:34AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 15 दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने आतापर्यंत चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तरीसुद्धा भातसा, अप्पर वैतरणा व मध्य वैतरणा तलाव भरण्यासाठी अजून 2 लाख 64 हजार दशलक्ष लिटर्स पाणीसाठ्याची गरज आहे. 

तलावाच्या क्षेत्रात 2017 च्या तुलनेत कमी पाऊस असला तरी, 2016 च्या तुलनेत चांगला पाऊस आहे. 2016 मध्ये तलावातील पाणीसाठ्याने 23 जुलैपर्यंत 8 लाख 46 हजार दशलक्ष लिटर्सचा टप्पा गाठला होता. 2017 मध्ये 12 लाख 25 हजार 866 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा होता. तर 2018 मध्ये 11 लाख 80 हजार 341 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा तयार झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या तानसा, मोडक सागर, विहार, तुळसी, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता आहे. 

शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावातील पाण्याची पातळी अजून आठ मीटरने खाली असून मध्य वैतरणा भरण्यासही अजून सव्वा मीटर पाण्याच्या पातळीची आवश्यकता असल्याचे जल अभियंता विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले. तलाव क्षेत्रात आतापर्यंत 1566 मिमी ते 2847 मिमी इतका पाऊस झाला आहे. आजही अधून-मधून पाऊस पडत असल्यामुळे ऑगस्टमध्येच सर्व तलाव ओसंडून वाहू लागतील, असा विश्वासही या अभियंत्याने व्यक्त केला. 

भातसाचा एक दरवाजा उघडला, गावे सतर्क

शहापूर : वार्ताहर

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्यातील धरणक्षेत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने मोडकसागर, तानसा ही धरणे मागील आठवड्यात भरून वाहू लागली. तर भातसा धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने सोमवारी सकाळी या धरणाचा एक दरवाजा 10 सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 

तत्पूर्वी प्रथेप्रमाणे स्थनिक आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. 142 मीटर उंची असलेल्या या धरणाची पातळी 134 वर पोहोचली आहे. त्यातच पावसाची रिपरिप सुरूच असल्याने धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. 

भातसा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीत 134 मीटर इतकी वाढ झाली आहे. पाण्याची आवक लक्षात घेता सोमवारी या धरणाचा एक दरवाजा 10 सेमीने उघडण्यात आला असून त्यातून 15 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. भातसा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या साजिवली, सावरशेत, खुटाडी, अर्जुनली, सापगाव, सरलांबे, आवरे, हिव, अंदाड, कांबारे, खुटघर, भातसई, वासिंद, शहापूर आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे तहसीलदार रवींद्र बाविसकर यांनी सांगितले.  दरम्यान 976.10 दशलक्ष घनमीटर पाणीक्षमता असलेले हे धरण पूर्ण भरण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार असून 142 ही अंतिम पातळी गाठण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता पवार यांनी सांगितले.