Sun, Aug 25, 2019 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा मंत्रालयात गोंधळ

सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा मंत्रालयात गोंधळ

Published On: Feb 02 2018 1:44AM | Last Updated: Feb 02 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मंत्रालयात गुरुवारी आयोजित केलेल्या दरबारात आपल्या सरपंच पत्नीसोबत बसू दिलेनाही, म्हणून संतापलेल्या अनेक सरपंच पती अर्थात ‘एसपीं’नी गोंधळ घातला. गर्दी वाढल्यानेआतमध्ये बसण्यास जागा नाही, असे या एसपींना सांगण्यात आले, पण जोशात असलेल्यांनी कुणाहीचेही ऐकले नाही.

जनतेमधुन थेट निवडून आलेल्यांचा सरपंच दरबार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सभागृहात आयोजित केला होता. या दरबारात महिला सरपंचांसोबत त्यांचे पतीही येतील, याची कल्पना होती. त्यानुसार जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. पण काही पती महाशयांनी आपल्यासोबत कार्यकर्त्यांनाही आणले होते.

दरबार भरायच्या आधीच गर्दी झाल्याने पोलिसांनी सरपंच वगळता त्यांच्यासोबत आलेल्या सरपंच पतीराज आणि कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व महिला सरपंचांच्या पतीराजांना आपल्या दालनात बसण्यास सांगितले.

त्यामुळे काहीसे खूष झालेल्या या पतीराजांनी थेट मंत्री दालन गाठल्याने दरबारात कामकाज सुरू झाले. या दरबारासाठी 150 सरपंचाना निमंत्रित केले होते. प्रत्यक्षात 200 सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते हजर झाल्याने सभागृहात जागा अपुरी पडली. त्यामुळे सरपंच पतिराजांना बाहेर काढावे लागल्याचे ग्रामविकास विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.