होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरपंचांचे मानधन वाढविणार

सरपंचांचे मानधन वाढविणार

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:09AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचा मान सरकार दरबारी वाढणार आहे. सरपंचांचे मानधन वाढीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगतानाच प्रत्येक सरपंचाला ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पहिलाच सरपंच दरबार घेतला. या दरबाराला सरपंचांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी मुंडे म्हणाल्या, राज्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल. राज्यातील पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी वेळ राखून ठेवणार असल्याचे सांगून त्यांच्याशी सामाजिक माध्यमांद्वारे थेट संपर्क साधणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. 

सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्वाचा घटक असल्याने त्याच्याकडून गावाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. गावात उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देता येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित बांधण्यात येणार आहेत. विविध विकास कामे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सरपंचांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.