Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सारथी’ अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

‘सारथी’ अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:45AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना सुचविणारा अहवाल गुरुवारी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्गदर्शन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या स्थापनेसंदर्भात पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. प्रसिद्ध विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डी.आर. परिहार यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली समिती शासनाने नेमली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याने आता संस्थेला गती मिळणार आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

या अहवालात विविध शिष्यवृत्त्या, विद्यावेतन, कौशल्यविषयक संधी, स्पर्धा परीक्षा व करिअरविषयक मार्गदर्शन, साहित्य निर्मिती यासह अनेक विकासविषयक योजना सुचविण्यात आल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून कृषी, कृषीसंलग्न व्यवसाय व जलसंधारणविषयक संशोधन, प्रसार व प्रशिक्षण यासाठी समन्वयाचे काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या समाजातील विविध घटकांच्या कौशल्यविकासासाठी विशेष प्रकल्प देखील राबविण्यात येणार आहेत. सारथीच्या माध्यमाने किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी सहा विशेष प्रकल्प राबविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. सारथी संस्थेची संरचना, कार्यपध्दती, उद्देश, योजना, कार्यक्रम-उपक्रम आणि इतर अनुषंगिक बाबींविषयी सविस्तर सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशीनुसार सारथी ही संस्था ना नफा-ना तोटा या तत्त्वावर चालविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Tags : Mumbai, Sarathi, report, submitted, Chief Minister