होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय पांडे, बिपीन बिहारी महासंचालकपदी

संजय पांडे, बिपीन बिहारी महासंचालकपदी

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 12:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सेवाज्येष्ठता डावलल्याने उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागलेल्या आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्यासह बिपीन बिहारी यांना बुधवारी महासंचालक पदी बढती जाहीर केली. पोलीस अस्थापना मंडळाने राज्य पोलीस दलातील वरील दोन्ही अधिकार्‍यांना बढती देण्याची शिफारस गृहमंत्रालयाला केली होती. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.

1986 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले पांडे हे उपमहादेशक होमगार्ड व उप संचालक नागरी संरक्षण पदी कार्यरत होते. सेवाज्येष्ठता दोन वर्षे आणि आठ महिन्यांनी डावलली गेल्याने पांडे यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पांडे यांच्याबाजूने निकाल दिला. त्यानंतर पांडे यांना बढती देण्याची शिफारस पोलीस अस्थापना मंडळाने मंगळवारी गृहमंत्रालयाला केली. या शिफारशीनुसार राज्यपालांच्या आदेशावरून पांडे यांना महासंचालक दर्जाच्या महासमादेशक होमगार्ड व संचालक नागरीक संरक्षण पदी बढती देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने काढले. या आदेशामुळे पांडे यांना निवृत्त होईपर्यंत पाच वर्षे महासंचालक पद कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली आहे.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थाचे अप्पर महासंचालक असलेल्या बिपीन बिहारी यांनासुद्धा महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. ते आता तुरूंग विभागाचे महासंचालक बनले असून गेल्या महिन्यातच राज्य शासनाने हे पद निर्माण केले होते. यामुळे राज्य पोलीस दलामध्ये आता महासंचालक दर्जाची आठ पदे झाली आहेत. यातील महत्वाचे असे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद रिक्त आहे.