Sat, Nov 17, 2018 18:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नॅशनल पार्कचा वणवा ठाण्याकडून बोरिवलीकडे

नॅशनल पार्कचा वणवा ठाण्याकडून बोरिवलीकडे

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 1:10AMठाणे : प्रतिनिधी 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोमवारी लागलेला वणवा हा दुसर्‍या दिवशीही कायम असून तो वाढू लागला आहे. या वणव्याचे लोण ठाणे परिसरापासून बोरिवलीच्या दिशेने वाढू लागले आहे. याप्रकरणी घोडबंदर रोडवरील कावेसर परिसरातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही परिसर ठाण्यात आला आहे. रविवारी घोडबंदर रोडवरील कावेसर परिसरातील डोंगरावर राजेश मोकाशी या व्यक्तीने वणवा लावला. तो वणवा पसरू लागला असून तो तिसर्‍या दिवशीही कायम आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकार्‍यांनी अटक केलेल्या राजेश मोकाशी याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. 

सोमवारी ठाण्यातील रामनगर येथील मामाभाचा डोंगरावर सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली आणि तत्काळ वन अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीड तासात आग आटोक्यात आणली आणि पुढील संभाव्य धोका टळला, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. मात्र मंगळवारी पुन्हा हा वणवा भडकला आणि गायमुखच्या दिशेने बोरिवलीकडे पसरू लागला आहे.