Wed, Mar 20, 2019 23:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन

पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 12:54AMमुंबई  :  विशेष प्रतिनिधी

ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकीन या अस्मिता योजनेच्या मोबाईल अ‍ॅप, लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मंत्रालयात झाले. येत्या महिला दिनापासून म्हणजे आठ मार्चपासून ही योजना सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी लोक अस्मिता स्पॉन्सर (अस्मिता प्रायोजक) होऊ शकतील. या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी लोकसहभागातून मदत उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना 50 मुलींना 12 महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन रक्‍कम वर्ग करून या 50 मुलींची अस्मिता स्पॉन्सरशिप स्वीकारली. ही स्पॉन्सरशिप स्वीकारणारे मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले ठरले. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 151 मुलींना 12 महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन रक्‍कम वर्ग करून या 151 मुलींची अस्मिता स्पॉन्सरशिप स्वीकारली.

अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना 240 मिमीच्या आठ पॅडचे एक पाकीट पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे.  अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलगी बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकीन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देणार आहे. किशोरवयीन मुलींना वर्षभरात 13 पाकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांना 240 मिमीच्या आठ पॅडचे एक पाकीट 24 रुपयांना, तर 280 मिमीच्या आठ पॅडचे एक पाकीट 29 रुपयांना उपलब्ध होणार आहे. बचतगट हे वितरकांकडून सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट खरेदी करून परस्पर विक्री करणार आहेत.