होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सांगलीत शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी

सांगलीत शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:58AMमुंबई : प्रतिनिधी

 पालघरच्या पोटनिवडणुकीवरुन भाजप  शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा कलगी तुरा रंगला असतानाच सांगली जिल्ह्यातील पलूस - कडेगांव पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा दिला आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने ही विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे. येथुन दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र  विश्‍वजीत कदम हे काँग्रेसच्या  तिकीटावर निवडणुक लढवित आहेत.  यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

पतंगराव कदम हे सहकार, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कर्तबगार व दिलखुलास नेते होते. राजकारण व सहकारात त्यांनी भूमिका ही पक्षाच्या पलिकडची होती. त्यांना श्रध्दांजली म्हणुन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. पण तसे दिसत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कदम यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्याचे या पत्रकात म्हंटले आहे. 

या मतदारसंघातुन भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिला आहे. आता या ठिकाणी राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेले दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतानाचे चित्र दिसणार आहे.