Sat, Jul 20, 2019 10:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बढती मिळाली नाही म्हणून संघवींची हत्या 

बढती मिळाली नाही म्हणून संघवींची हत्या 

Published On: Sep 10 2018 1:21AM | Last Updated: Sep 10 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ उकलण्यात अखेर रविवारी मुंबई पोलिसांना यश आले. कार्यालयीन बढतीच्या वादातून सहकार्‍यानेच संघवी यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर येत असून एका 20 वर्षीय मारेकर्‍याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याच आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलीस आता संघवी यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

संघवी हे नेहमीप्रमाणे कार्यालयीन काम आटोपून बँकेच्या लोअर परळमधील कमला मिल कम्पाऊंडमध्ये असलेल्या कार्यालयातून 5 सप्टेंबरच्या सायंकाळी बाहेर पडले. मात्र ते मलबार हिलमधील घरी पोहोचलेच नाहीत. त्यांचा मोबाईलसुद्धा बंद येत होता. सर्वत्र शोध घेऊनही ते नसापडल्याने त्यांच्या पत्नीने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून संघवी हरवल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हे शाखेनेही संघवी यांचा शोध सुरू केला. दुसर्‍या दिवशी नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर 11 जवळ संघवी यांची रक्ताने माखलेली कार पोलिसांना सापडली. मुंबई पोलिसांनी ही कार ताब्यात घेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवली. कारच्या मागच्या सीटवर रक्‍ताचे डाग पडलेले होते. शिवाय एक चाकूदेखील तिथेच पडलेला आढळला. 

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि खबर्‍यांच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले. यात 20 वर्षीय मारेकरीसुद्धा होता. त्याने संघवी यांच्या हत्येची कबुली देताच नवी मुंबई पोलिसांनी त्याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने गुन्ह्याची कबुली देत संघवी यांचा मृतदेह फेकलेले ठिकाण पोलिसांना सांगितले.

रविवारी सायंकाळपर्यंत संघवी यांचा मृतदेह सापडलेला नव्हता. मात्र त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातही एचडीएफसीसारख्या अत्यंत मोठ्या खासगी बँकेत बढतीवरून अधिकार्‍याची हत्या व्हावी हेच मोठे आक्रित समजले जाते. काही महिन्यांपूर्वी  मेमो दिला म्हणून एका सलून कंपनीची एक्झिक्युटिव्ह कीर्ती व्यास हिची तिच्याच सहकार्‍यांनी हत्या केली होती. 

संघवींना नुकतीच बढती मिळाली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याचा राग एका सहकार्‍याच्या मनात होता. त्यानेच एका कामगाराला संघवी यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्या दिवशी संघवी कार्यालयातून बाहेर पडून कार पार्किंगच्या ठिकाणी जात असतानाच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संघवी बँकेतून बाहेर पडून पार्किंगकडे जाताना दिसतात. या पार्किंग लॉटमध्येच त्यांची हत्याकरण्यात आली असावी व नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असू शकते. संघवी यांनी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बँक सोडली. हे सीसीटीव्हीमध्येदिसते. मात्र, पार्किंगमधून त्यांची कार बाहेर पडलेली दिसत नाही.  संघवी यांच्या मोबाईलचे शेवटचे ठिकाणही सायंकाळी सातच्या दरम्यान कमला मिल कम्पाऊंडमध्येच आढळले. त्यानंतर मात्र,त्यांचा फोन बंद झाला. आता त्यांच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्सदेखील तपासलेजाणार आहेत.