Mon, Apr 22, 2019 15:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघवी बंधू, मानकर गजाआड

संघवी बंधू, मानकर गजाआड

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना अखेर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात अटकेत असलेल्या विशाल कारीयाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल 13 दिवसांच्या शोधकार्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये 14 जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर 41 जण जखमी झाले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चार तर भायखळा पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वन अबव्हमध्ये मृतांचा आकडा अधिक असल्याने प्राथमिक तपासाअंती मालक संघवी बंधू आणि मानकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला होता. तिघेही बड्या व्यक्ती असल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावत त्यांच्या शोधासाठी मुंबईसह महाराष्ट्र आणि राज्याबाहेर पोलीस पथके रवाना केली होती.

तपासादरम्यान तिन्ही आरोपी कारीयाच्या संपर्कात असून त्याच्या घरी वास्तव्य केल्याचे उघड झाल्यानंतर आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी कारीयाला बेड्या ठोकल्या. संघवी बंधू आणि मानकर हे पुढे काय करणार हे कारीयाला माहिती होते. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच संघवी बंधू हे रात्री खारमध्ये, तर मानकर हा सकाळी मरीन लाईन्स येथे येणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्रीच्या सुमारास संघवी बंधूना खारमधील केएफसी मॉलजवळून आणि सकाळी साडेसातच्या सुमारास मानकर याला मरीनप्लाझाजवळून ताब्यात घेत अटक केली. भोईवाडा न्यायालयाने तिन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आणि मोजोस बिस्त्रोचा मालक युग पाठक याच्यासह युग रविंद्रपालसिंग तुली यांची नावे गुन्ह्यात वाढवत पाठकला अटक केली. मात्र याचा सुगावा लागल्याने 5 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या संपर्कात असलेला तुली पसार झाला. पोलिसांनी पालिकेच्या तक्रारीवरुन एमआरटीपी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तुली याचा जबाब नोंदविला होता. गुन्ह्यात नाव आल्यानंतर तुली पसार झाल्याने त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आल्याचे एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले.