Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिळक भवनात राष्ट्रगीताऐवजी संघाची प्रार्थना

टिळक भवनात राष्ट्रगीताऐवजी संघाची प्रार्थना

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:45AMमुंबई : खास प्रतिनिधी

मुंबईतील टिळक भवनाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीताऐवजी चक्‍क नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... ही रा. स्व. संघाची प्रार्थनाच सुरू झाली तर? विचित्र वाटतेय ना? पण असे घडलेय आणि तेदेखील 26 जानेवारीलाच. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांना धक्‍काच बसला. अर्थात, असे काही घडलेच नाही, असा खुलासा काँग्रेसने केला असला, तरी आज पत्रकारांमध्ये याच गोष्टीची खमंग चर्चा सुरू होती.

यंदा प्रजासत्ताकदिनी टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी तिरंगा फडकावल्यानंतर मानवंदना झाली आणि एकसाथ राष्ट्रगीत शुरू कर, अशी आज्ञा दिली गेली. त्याबरोबर ध्वनिवर्धकावर राष्ट्रगीत लावण्यासाठी सी.डी. टाकली गेली. मात्र, त्यातून सुरू झाली, ती संघाची प्रार्थना! सावधानच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या काँग्रेसजनांची या अचानक झालेल्या प्रकाराने तारांबळ उडाली. राष्ट्रगीताऐवजी संघाच्या प्रार्थनेचे सूर ऐकून अशोक चव्हाण यांचा तिळपापड झाला. त्यानंतर ध्वनिक्षेपक तत्काळ बंद करून राष्ट्रगीताची सी.डी. शोधायची धावपळ सुरू झाली. अखेर राष्ट्रगीत आणि संघाची प्रार्थना एकाच सी.डी.त असल्याने हा घोटाळा झाल्याचा खुलासा झाला. तरुण भारतच्या जळगाव आवृत्तीने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी असा काही प्रकार घडलाच नाही, असे सांगितले. आपण स्वत: त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो आणि सी.डी. तयार करण्याची जबाबदारीही आपली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.