होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना ग्रामस्थांचा घेराव

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना ग्रामस्थांचा घेराव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कल्याण : प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट होऊनही सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत २७  गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव घातला. यावेळी ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली. स्वतंत्र नगरपालिका हवी यासाठी २७ गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

महापालिकेची नुकतीच सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त गोविंद बोडके यांचा शनिवारी सकाळी २७ गावांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यावेळी २७ गावांच्या न्यायासाठी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पालिका आयुक्तांचा ताफा रोखला. तसेच काटई पोलीस चौकीजवळ पालिका आयुक्तांना घेराव घातला. यावेळी २७  गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर आरोग्य यंत्रणा, शाळा, पायाभूत सुविधा, वाढवून आलेली मालमत्ता कराची बिलं आदीं प्रश्नांची सरबत्ती केली. 

त्यावर संघर्ष समितीचे जे काही म्हणणे असेल ते आपण नक्कीच शासनाला कळवू, असे उत्तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान आयुक्तांशी बोलणी झाल्यावर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बाहेर येत महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करून आपला रोष व्यक्त केला. तसेच २७ गावांची वेगळी नगरपालिका करा. तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही, या घोषणेचाही पुनरुच्चारही केला. 

यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये गंगाराम शेलार, गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, दशरथ पाटील, विजय भाने, गजानन मंगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वझे, वासुदेव गायकर, कृष्णाबुवा मढवी, सुधीर पाटील, गजानन पाटील, यांच्यासह २७ गाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Sangharsh Samiti, Nagar Palika,  Kalyan Dombivli, Municipal Corporation, 27 Villages, Sangharsh Samiti


  •