Fri, Apr 19, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संदीप येवलेंनी प्रसारमाध्यमांसमोर फेकलेले ४० लाख पोलिसांकडे, मग ६० लाख गेले कुठे?

संदीप येवलेंनी प्रसारमाध्यमांसमोर फेकलेले ४० लाख पोलिसांकडे, मग ६० लाख गेले कुठे?

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:32AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

विक्रोळी पार्कसाईटच्या हनुमाननगर झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम संदीप येवले या स्थानिक कार्यकर्त्यामुळे गेली 22 वर्षे रखडले असून आता तर त्याने प्रकल्प रोखण्यासाठी रहिवाशांचे भाड्याचे पैसेही खाल्‍ले आणि  रहिवाशांचे भाडे म्हणून बिल्डरकडून घेतलेल्या 1 कोटी रुपयांपैकी तब्बल 60 लाख रुपये कागदपत्रे, झेरॉक्सवर खर्च झाल्याचा दावा येवले करतात. अशा प्रकारच्या प्रवृत्तींवर सरकारच जालीम उपाय शोधत नाही तोपर्यंत हनुमाननगरसारखे एसआरए प्रकल्प कितीही काळ रखडू शकतात, अशी भीती आता व्यक्त होत आहे. 

मुंबई मराठी पत्रकार संघातील एका पत्रकार परिषदेत स्थानिक रहिवासी आणि स्वयंविकास कार्यकर्ता संदीप येवले यांनी 40 लाख रुपयांची रोख रक्कम टेबलावर ओतून एकच खळबळ उडवून दिली. आणि गेली 22 वर्षे  रखडलेला  विक्रोळीच्या पार्कसाईटमधील हनुमाननगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला. विकासकाने एक कोटीची लाच दिली, असा दावा येवले यांनी केला. आणि त्यातले फक्‍त 40 लाख पत्रकारांना दाखवले. 60 लाख गेले कुठे? रहिवाशांच्या भाड्यासाठी विकासकाने दिलेली रक्कम येवले यांनी लाचेची रक्कम म्हणून सांगितली शिवाय त्यातले 60 लाख रुपयांचे मोबाईल्स व इतर चैनीच्या वस्तूंवर स्वत:साठी खर्च केले.

रहिवाशांचे 60 लाख कुठे उडवले?

हनुमाननगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचार माहिती अधिकाराच्या अंतर्गत उघड केल्यानंतर ओमकार बिल्डरकडून 11 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप करत येवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जुलै महिन्यात घेतलेल्या परिषदेत केला होता. मात्र 29 मार्च 2017 रोजी मिळालेल्या 1 कोटी रुपयांपैकी फक्त 40 लाख रुपये येवले पत्रकार परिषदेत सादर करू शकले होते. उरलेले 60 लाख रुपये गेल्या चार वर्षात उप जिल्हाधिकारी, एसआरए, हाय पॉवर कमिटी यांच्यासमोर आव्हान देण्यासाठी, तसेच गेल्या चार वर्षात घेण्यात आलेल्या सभा, प्रिंटिंग, झेरॉक्स, पुरावे गोळा करणे, आरटीआयमधून माहिती गोळा करण्यात खर्च केल्याचा दावा येवले यांनी केला आहे.

येवले यांना देण्यात आलेले 1 कोटी रुपये रहिवाशांच्या भाड्यापोटी होते, असे या प्रकल्पाचे विकासक ओमकार बिल्डर्स यांनी येवले यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच जाहीर केले. ही रक्‍कम त्यांच्याकडे अकाऊंट्समध्ये जमा नोंद असलेली होती. परिणामी, येवले यांचे समाजसेवेचे भांडे फुटले. भाड्याचे पैसे परस्पर उडवले म्हणून हनुमाननगरचे रहिवाशीही मग भडकले. 

रहिवाशांच्या भाड्याचे पैसे खर्च करण्यावर आक्षेप घेत काही रहिवाशांनी येवलेंविरोधात पत्रकार संघाबाहेर निदर्शने करत निषेधही केला. त्यानंतर परस्पर सत्यनारायण घालण्याचा प्रयत्न करीत 40 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे येवले यांनी जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे स्विकारण्यास नकार दिल्याने येवलेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या. 

मुख्यमंत्री तसेच लाच लुचपत विभाग (एसीबी), अंमलबजावणी संचनालय (ईडी) या यंत्रणासुद्धा रक्कम आपल्या ताब्यात घेत नसल्याने, अखेर ही रक्कम आदिवासी कल्याण किंवा अपंग कल्याणावर खर्च करण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी येवले यांनी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे ही रक्कम येवले यांच्याकडेच राहीली. येवले यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दाखविलेल्या रकमेबाबत विकासकाचीही तक्रार नसल्याने कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण, विकासकाने ही संपूर्ण रक्‍कम रहिवाशांचे भाडे म्हणून दिली होती.  त्यातले 60 लाख येवले यांनी  स्वत:च्या चैनीसाठी खर्च केले आणि 40 लाख रुपयांच्या रोख रकमेची वरात अखेर कफ परेड पोलीस ठाण्यात जावून थांबली. 

येवलेंनी अखेर या 40 लाखांतील 4 लाख रुपये विदर्भातील काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे दिले. ठाकूर यांनी हे पैसे विधानसभेसमोर ठेऊन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. उरलेले 36 लाख रुपये येवलेंनी आमदार बच्चू कडू यांच्या मदतीने आंदोलन करत पुन्हा जनतेसमोर आणले. अखेर पोलीस दलातील वरीष्ठांनी ही रक्कम कफपरेड पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देष येवलेंना दिले. त्यानुसार येवलेंनी 36 लाख आणि आमदार ठाकूर यांनी 4 लाख असे एकूण 40 लाख रुपये कफ परेड पोलीस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी येवलेंचा जबाब नोंदवून घेत याची माहिती आयकर विभाग आणि पार्क साईट पोलिसांना देण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून कफ परेड पोलीस ठाण्यातील लॉकरमध्ये ही रक्कम पडून आहे. विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येवलेंनी बिल्डरकडून पैसे घेतले असल्याने याप्रकरणाची चौकशीची जबाबदारी पार्कसाईट पोलिसांकडे आहे. प्रकराणाच्या चौकशीबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना विचारले असता संदीप येवले जबाब नोंदविण्यासाठी आलेच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags : Mumbai, Mumbai news, Sandeep Yewale issue,