Tue, Jun 25, 2019 16:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, पुण्यात दहशतवादी हल्‍ले करण्याचा सनातनचा कट होता

मुंबई, पुण्यात दहशतवादी हल्‍ले करण्याचा सनातनचा कट होता

Published On: Dec 07 2018 1:48AM | Last Updated: Dec 07 2018 1:39AM
मुंबई : खास प्रतिनिधी

राज्याच्या  विविध भागांतून अटक केलेले तरुण सनातन संस्थेसह अन्य हिंदू कट्टरपंथीय संघटनांचे सदस्य असून, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी घातपाती कारवाया करण्याचा कट त्यांनी आखला होता. इतकेच नव्हे, तर या तरुणांची दहशतवादी टोळीच तयार झाली होती.

समविचारी तरुणांच्या या टोळीने त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्या व्यक्‍तींना टार्गेट करण्यासाठी स्फोटकांसह घातक शस्त्रांचा साठा केला आणि त्याच्या सहाय्याने त्यांचा मुंबई, पुण्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा डाव होता, अशा धक्‍कादायक बाबी दहशतवादविरोधी पथकाने विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राद्वारे उघड झाल्या आहेत.

आरोपपत्रात प्रथमच सनातन संस्थेचा थेट उल्‍लेख

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या काही महिन्यांत राज्यभरातून अनेक तरुणांना अटक केली. त्यापैकी काही जणांच्या घरी वा ताब्यात घातक स्फोटके सापडली होती. हिंदू दहशतवाद पसरवण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी तेव्हा केला होता. त्यानंतर एटीएसने कसून तपास करून अनेक धक्‍कादायक बाबी उजेडात आणल्या. यासंदर्भात पकडलेल्या बारा जणांविरोधात सुमारे सहा हजार पानांचे आरोपपत्र एटीएसने विशेष सत्र न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात पहिल्यांदा सनातन संस्थेचा थेट उल्लेख करण्यात आला आहे.

आरोपपत्राचा आधार नालासोपारा, सोलापूर, सातारा

नालासोपारा, सोलापूर, सातारा येथून पकडलेला स्फोटकांचा तसेच शस्त्रांचा साठा, दोन मोटारी, पाच मोटारसायकल, एका मोटरसायकलचे सुटे भाग, नंबर प्लेट आदी गोष्टी, याखेरीज आरोपींनी शस्त्रे-स्फोटके तयार करून ती चालवण्यासाठी  प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणांचा आणि या सगळ्या कारवायांसाठी मिळालेली आर्थिक मदत या सगळ्याच्या आधारे हे आरोपपत्र एटीएसने दाखल केले आहे.

पकडलेल्या बारा जणांपैकी बहुतेक आरोपींकडे सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधनेच्या पुस्तिका सापडल्या होत्या. त्यात नमूद केलेले हिंदू राष्ट्रनिर्मिती हेच या आरोपींचे ध्येय होते. आपल्या या ध्येयास बाधा ठरणार्‍या विचारसरणीचे  विचारवंत आणि  प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या हत्यांसाठी या टोळीने केलेल्या हालचालींबाबतही या आरोपपत्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बेळगाव, कल्याण येथील सिनेमा थिएटरमधील स्फोटांसह पुण्यातील गेल्या वर्षी झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडविण्याच्या कटाचीही माहिती एटीएसने आरोपपत्रात दिली आहे. गोव्यात केंद्र असलेल्या सनातन आणि हिंदू जागृती या संस्थांचे हे आरोपी सदस्य असून, बॉम्बस्फोट करून सामान्य जनतेत दहशत माजवण्याचा या टोळीचा डाव होता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.