Wed, Jan 16, 2019 04:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘समृद्धी’च्या दुतर्फा  700 किमीची संरक्षक भिंत

‘समृद्धी’च्या दुतर्फा  700 किमीची संरक्षक भिंत

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृध्दी महामार्गाच्या सुधारीत 55 हजार कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 700 किमी लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे महामार्गाचे बजेट 49 हजार कोटीवरून 55 हजार कोटींवर गेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या प्रकल्पास अनेक जिल्ह्यात भूसंपादनावरून  ग्रामस्थांचा विरोध झाला. परिणामी भूसंपादनासाठी जास्त मोबदला द्यावा लागल्याने प्रकल्पाच्या खर्चात आधीच वाढ झाली होती. या प्रकल्पाचा पूर्वी मूळ अभियांत्रिकी खर्च सुमारे 30 हजार कोटी इतका होता. यानंतर नुकसानभरपाई, भूसंपादन, कर्जावरील व्याज, सरकारी शुल्क व कर यासह प्रशासकीय खर्च 49 हजार कोटींवर गेला. आता संरक्षक भिंत व महामार्गाचे काँक्रीटीकरणामुळे हाच खर्च 55 हजार कोटींवर गेल्याची माहिती एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षक भिंतीसाठी महामार्गालगत जमिनीचे नव्याने संपादन करावे लागणार नाही. या भिंतीमुळे अपघातावेळी सुरक्षा निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

महामार्गाचा पृष्ठभाग डांबराऐवजी काँक्रीटचा करण्यात येणार असल्याने प्रकल्पाच्या मूळ खर्चात वाढ होणार आहे. मात्र यामुळे पुढील अनेक वर्षे देखभालीवरील खर्च कमी होणार आहे. परिणामी रस्त्याच्या आयुर्मानात 20 ते 22 वर्षांची वाढ होणार आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

एमएसआरडीसीने घेतलेल्या कर्जावरील व्याज पहिली तीन वर्षे राज्य सरकार भरणार असून प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरापासून  एमएसआरडीसी दरमहा आपला अहवाल राज्य मंत्रिमंडळास सादर करेल, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. सदर समृध्दी महामार्ग राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमधून जाणार आहे.