होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समीर भुजबळांच्या जामिनाला ईडीचा विरोध

समीर भुजबळांच्या जामिनाला ईडीचा विरोध

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गेले दोन वर्ष अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जाला ईडीने जोरदार विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च  न्यायालयाने  जामीन मंजूर केला असला तरी त्या मुद्यावर समीर भुजबळ यांना जामीन देता येणार नाही, असा दावा करून आम्हाला यावर युक्तिवाद करायचा आहे, अशी भूमिका अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात मांडली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी अर्जाची सुनावणी गुरुवार 24 मे पर्यंत तहकूब ठेवली.

महाराष्ट्र सदन बांधकाम, कालिना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम, अंधेरी आरटीओ प्रकरण, मुंबई नाशिक हायवे टोल, वांद्रे येथील एमआयजी कॉलनी, नवी मुंबई  हेक्स वर्ल्ड गृहप्रकल्प अशा अनेक प्रकल्पातून भुजबळ कुटूंबीयांनी सुमारे 840 कोटीचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना अटक केली. गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

समीर भुजबळ यांनीही जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयालयात प्रलंबित होता. छगन भुजबळ यांच्या जामिनाविषयीच्या आदेशाची प्रत उपलब्ध होताच समीर यांनाही तातडीने जामीन मंजूर करण्याची विनंती करणारा अर्ज अ‍ॅड. एस. के. सक्सेना यांनी उच्च न्यायालयात केला आहे. त्या अर्जावर उच्च न्यायालयाचे सुटीकालीन न्यायालयाचे  न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली.