Sun, Apr 21, 2019 00:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोईसरमधील कल्पेश दौडाच्या जिद्दीला सलाम

बोईसरमधील कल्पेश दौडाच्या जिद्दीला सलाम

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:24AMडहाणू ग्रामीण : चंद्रकांत खुताडे

डहाणूतील दिव्यांगांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अपंगमित्र सेवा मार्गदर्शन मंडळ या संस्थेचा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी कल्पेश दौडा याने कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 75.40 टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पालघर जिल्ह्यातील कल्लाळे येथील कल्पेशला जन्मतःच दोन्ही हात नव्हते. पण, पायाने पेपर लिहून त्याने सचोटी, संघर्ष आणि निव्वळ शिक्षण घेण्याची ध्येयसक्तीमुळे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 

कल्पेशने बोईसरजवळील बेटेगाव आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत शिक्षण घेतले. हात नसले तरी त्याने शिक्षणाची आवड कधीही सोडली नाही. कल्लाळे गावापासून त्याच्या शाळेचे अंतर तीन किमी आहे, जायला रस्ता नाही. त्यामुळे तो दररोज सहा किमीचा प्रवास करत असे. पावसाळ्यात तर चिखल तुडवत शाळेत जावे लागायचे. अडचणी कितीही असल्या तरीही मार्ग काढण्याची तयारी असल्याने लिहिण्यासाठी त्याने मदतनीस न घेता पायाने अक्षर गिरवायला सुरुवात केली. त्याने पायाने लिहिण्याचा सराव करून प्रभुत्व मिळवले. संपूर्ण लिखाण तो पायानेच करतो. त्याने आतापर्यंतच्या सर्व परीक्षा पायानेच लिहून उत्तम गुणांनी पास होण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटची आवड जोपासत तो गोलंदाजीही पायानेच करतो. कल्पेश हा आदिवासी समाजातील विद्यार्थी असून त्याचे वडील बोईसरमधील एका कारखान्यात बारा तास ड्युटी करतात. सरकारी योजना पोहोचल्या नसल्याने आई-वडील, दोन बहिणींसोबत तो कुडाच्या घरात राहतो. या परिस्थितीवरही मात करत त्याने हे यश मिळवलं आहे.