Tue, Apr 23, 2019 08:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सालेमची पुन्हा मानवाधिकार युरोपच्या न्यायालयात धाव

सालेमची पुन्हा मानवाधिकार युरोपच्या न्यायालयात धाव

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 1:59AMमुंबई : प्रतिनिधी

आपले भारताकडे करण्यात आलेले प्रत्यार्पण रद्द करुन आपणास पुन्हा पोर्तुगालला पाठवण्यात यावे, या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याने पुन्हा मानवाधिकार युरोपियन न्यायालयात धाव घेतली आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी आपणास दोषी धरले गेल्याने भारत-पोर्तुगाल दरम्यान झालेल्या प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा सालेम याने आपल्या ताज्या याचिकेत केला आहे.

आपल्या वकिलामार्फत अबू सालेम याने दुसर्‍यांदा मानवाधिकार युरोपियन न्यायालयाला पत्र लिहून भारताकडून झालेले प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन तसेच याप्रकरणी पोर्तुगीज सरकारकडून दाखवण्यात आलेल्या निष्क्रियतेबद्दल त्यात आरोप केला आहे. यापूर्वी गेल्या जूनमध्ये त्याने मानवाधिकार युरोपियन न्यायालयात धाव घेऊन 1993 च्या स्फोटाबाबत सुरु करण्यात आलेला खटला म्हणजे प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी 16 जून 2017 रोजी टाडा न्यायालयाने त्यास दोषी धरत 7 सप्टेंबर 2017 रोजी त्यास 25 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. यामुळे प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोर्तुगीज सरकारने भारत सरकारला जाब विचारायला हवा तसेच आपणास पुन्हा पोर्तुगालला बोलावून घेण्यात यावे, अशी विनंतीही सालेम याने या पत्रात केली आहे.