होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बोगस उत्पादनाची विक्री; टोळी गजाआड

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बोगस उत्पादनाची विक्री; टोळी गजाआड

Published On: May 21 2018 1:37AM | Last Updated: May 21 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या बोगस सौदर्यप्रसाधनाची विक्री करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत शनिवारी एका व्यापार्‍यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अब्दुल वहाब जलालउद्दीन सैय्यद, राजेश तुकाराम देसाई, रामदास केशव रहाटे, नितीन गोपाळ पोरे, किशोर मारुती तामाणेकर, रघु देवा पटेल, अब्दुल फारुख मोहम्मद उमर अन्सारी अशी या सातजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुर्ला परिसरात राहणारे तक्रारदार हबीबुर रेहमान खान हे हिदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीत बॅ्रंण्ड प्रोटेशन कन्सल्टंट म्हणून कामाला आहेत. या कंपनीचे सौदर्य प्रसाधनाचे मुंबईसह भारतात तसेच विदेशात उपलब्ध आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या कंपनीच्या बोगस सौदर्यप्रसाधनाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच त्यांनी त्याची गुप्तपणे शहानिशा सुरु केली होती. काही सौदर्यप्रसाधन विकत घेतल्यानंतर ते त्यांच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यावेळी संबधित सौदर्यप्रसाधने बोगस असल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने मुंबई हायकोर्टात एक याचिका सादर करण्यात आली होती.

यावेळी कोर्टाच्या आदेशानंतर शिवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. याच दरम्यान पोलिसांनी सातपैकी पाच दुकानासह गोदामात छापा टाकून तेथून लाखो रुपयांचे कंपनीचे बोगस सौदर्यप्रसाधने जप्त केली होती. याच गुन्ह्यांत नंतर  अब्दुल वहाब याच्यासह इतर सहाजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस येताच या सातजणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत अब्दुल सैय्यद याला यापूर्वीही अशाच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती.

या गुन्ह्यांत दोन आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात देवशीभाई समाभाई रबारी ऊर्फ देवा आणि धर्मेंद्रभाई परमार यांचा समावेश आहे. या दोघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.