Fri, May 24, 2019 03:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकेत पुलाला तडे; तीन तास वाहतूक कोंडी  

साकेत पुलाला तडे; तीन तास वाहतूक कोंडी  

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 12:57AMठाणे : प्रतिनिधी 

मंगळवारी साकेत उड्डाणपुलाला तडा गेल्यामुळे  मुंबई-नाशिक हायवेवर तीन तास वाहतूक कोंडी झाली. नाशिकवरून मुंबईकडे येणार्‍या लेनवर मोठी भेग पडल्याने पूल धोकायदाक झाल्याच्या अफवाही पसरल्या. यामुळे कल्याण, नाशिक आणि भिवंडी पुढे मुंबईला जाणार्‍या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मात्र पूल धोकादायक नसल्याचे हायवे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली असून स्टीलची प्लेट टाकून ही गॅप बुजवण्यात आली असून यावर कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम या आठवड्याच्या शेवटी करण्यात येणार  आहे.

 यापूर्वीच मुंब्रा बायपासचे काम सुरू करण्यात आले असल्याने काही प्रमाणात ही वाहतूक या मार्गावर वळवण्यात आली असल्याने या मार्गावरचा वाहतुकीचा भार वाढला असतानाच मंगळवारी सकाळी पुलाच्या जॉइन्टमध्ये पुन्हा भेग पडल्याने  एका लेनची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. 

वाढलेल्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात व्हायब्रेशन होऊन जॉइन्टमध्ये भेग पडल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.हा पूल दोन लेनचा असून ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे तेवढ्याच भागमध्ये बॅरेकेट टाकण्यात आले असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. त्यामुळे खारेगाव टोलनाक्याकडे जाणारी वाहतूक धीमी झाली आणि जवळपास तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी हायवे प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असल्याचे काळे यांनी सांगितले.