Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सागर इन्व्हेस्टमेंट’च्या समुद्र दाम्पत्याला जामीन

‘सागर इन्व्हेस्टमेंट’च्या समुद्र दाम्पत्याला जामीन

Published On: Dec 28 2017 1:30AM | Last Updated: Dec 28 2017 12:46AM

बुकमार्क करा
बदलापूर : वार्ताहर

‘सागर इन्व्हेस्टमेंट’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारत हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणार्‍या समुद्र कुटुंबातील सुहास आणि सुनिता समुद्र यांना प्रकृती आणि वयाच्या निकषावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. कल्याण येथील सत्र न्यायालयात याप्रकरणी नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी हा जामीन मंजूर झाला. दरम्यान, सून अनघा आणि मुलगी भक्ती यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तर श्रीराम समुद्र अद्यापही हाती लागला नाही. सध्या या प्रकरणातील सर्वच आरोपी तुरूंगाबाहेर आले आहेत.

बदलापुरात 28 वर्षांहून अधिक काळ गुंतवणुकीचा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍या सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीने 2017 च्या सुरुवातीसच तळ गाठल्याने गुंतवणूकदारांचे व्याज देणेही कंपनीला मुष्किल झाले. त्यानंतरही पैसे मिळत नसल्याने चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर संतापलेल्या गुंतवणूकदारांनी अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संचालक सुनिता आणि सुहास समुद्र यांच्यासह मुलगा श्रीराम, त्याची पत्नी अनघा व भक्ती समुद्र यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांतच सुहास व सुनीता समुद्र यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे शरणागती पत्करली होती. 

गेल्या आठवड्यात वयोवृद्ध सुहास आणि सुनिता या समुद्र दाम्पत्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर समुद्र दाम्पत्याला दिलासा मिळाला असून, दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.