Thu, Jul 18, 2019 14:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यावरील ‘मोका’ हटिंवला

साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यावरील ‘मोका’ हटिंवला

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:18AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने  मोठा दिलासा दिला. या सर्वांची न्यायाधीश श्रीपाद टिकाले यांनी ‘मोका’ कायद्यातून मुक्‍तता केली. त्यांच्या विरोधात आता केवळ बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) या कायद्यातील कलमांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेतील अन्य कलमांतर्गत हा खटला चालणार आहे. तर या खटल्यातील शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्‍कलकी या तिघा आरोपींची न्यायालयाने कायमची मुक्‍तता केली.

29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या या स्फोटात साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींविरोधातील ‘मोका’ हटविल्यानंतर या दोघांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर  साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात  खटल्यातून  आरोपमुक्‍त करावे, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायाधीश श्रीपाद टिकाले यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा अर्ज अंशत: मंजूर करताना खटल्यातून मुक्‍त करण्याची विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्याविरोधातील ‘मोका’ हटविला. मात्र, त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील कलम 18 आणि भारतीय दंडसंहितेतील कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य कलमांतर्गत, तर राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दोन अन्य आरोपींवर शस्त्रास्त्र कायद्याखाली खटला चालणार असल्याचे स्पष्ट केले.